शेकडो दात्यांच्या रक्तरूपी समिधेने पेटला रक्तदानाचा राज्यस्तरीय महायज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:02 AM2021-07-03T04:02:06+5:302021-07-03T04:02:06+5:30

औरंगाबाद : स्वातंत्र्यसेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या ९८व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘लोकमत रक्ताचं नातं’ ...

The state-level Mahayagya of blood donation was ignited by the blood of hundreds of donors | शेकडो दात्यांच्या रक्तरूपी समिधेने पेटला रक्तदानाचा राज्यस्तरीय महायज्ञ

शेकडो दात्यांच्या रक्तरूपी समिधेने पेटला रक्तदानाचा राज्यस्तरीय महायज्ञ

googlenewsNext

औरंगाबाद : स्वातंत्र्यसेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या ९८व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तदानाच्या राज्यस्तरीय महायज्ञाचा शुभारंभ शुक्रवारी (दि.२) औरंगाबादेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाला. पहिल्याच दिवशी शेकडो दात्यांनी रक्तरूपी समिधा देऊन हा महायज्ञ धगधगता पेटता केला.

महाराष्ट्राच्या समृद्ध सामाजिक व सांस्कृतिक परंपरेला पुढे नेताना, कोरोना काळात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा दूर करतांना नागरिकांचे लाखमोलांचे प्राण वाचविण्यासाठी लोकमत समूहाने महारक्तदान शिबिराचे आयोजन करून शुक्रवारी माणुसकीचे पुन्हा एक पाऊल पुढे टाकले.

लोकमत भवनात झालेल्या महारक्तदान शिबिराच्या शुभारंभप्रसंगी ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता, मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर, श्री ओम स्टीलचे सीईओ नितीन भारुका, विक्रम टी प्रोसेसर प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक शुभम पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

भाईश्री व्हेंचरचे संचालक प्रवीण सोमाणी, डाबरचे टेरीटेरी व्यवस्थापक चंद्रहास हेगडे, विभागीय रक्तसंक्रमण अधिकारी डाॅ. सविता सोनवणे, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) विकृतीशास्त्र विभागप्रमुख डाॅ. अनिल जोशी आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. ‘लोकमत’चे संपादक नंदकिशोर पाटील यांनी आभार मानले.

--------

महारक्तदान शिबिर आयोजनामागील भूमिका

राजेंद्र दर्डा यांनी प्रास्ताविक करताना राज्यस्तरीय महारक्तदान शिबिर आयोजनामागील ‘लोकमत’ची भूमिका विषद केली. ते म्हणाले, कोविडमधून आपण थोडे बाहेर पडलो आहोत. पण अद्याप कोविड पूर्णपणे गेलेला नाही. शस्त्रक्रियांसाठी रक्ताची आवश्यकता असते. व्यवहार सुरळीत झाल्याने वाहतूक सुरू झाली आहे आणि दररोज अपघात होत आहेत. अशा सगळ्या ठिकाणी रक्ताची गरज असते. रक्ताच्या बाबतीत अनेक संभ्रम निर्माण झालेले आहे. लस घेतलेली आहे, मग रक्त द्यावे की नाही, किती दिवसांनंतर रक्तदान करावे, असे अनेक प्रश्न निर्माण झाले. पण गेल्या महिनाभरापासून ‘लोकमत’ने जनजागरण माेहीम हाती घेतली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. सगळ्या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे मोठे सहकार्य मिळाले आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आणि सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे सहकार्य मिळत आहे.

-------

नवचैतन्य निर्माण करणारा उपक्रम : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले, कौटुंबिक, सामाजिक असे अनेक प्रकारचे नाते असते. परंतु याबाहेर जाऊन रक्ताचं नातं ही नवीन संकल्पना ‘लोकमत’ने आणली. ‘लोकमत रक्ताचं नातं’ या महारक्तदान शिबिराच्या माध्यमातून लोकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा उपक्रम ‘लोकमत’ने हाती घेतला आहे.

-----

‘लोकमत’चे सामाजिक बांधिलकीशी अतूट नाते : आरोग्यमंत्री राजेश टोपे

किल्लारी येथील भूकंप असो की पैठणचा महापूर, कारगीर युद्धातील सैनिकांच्या पाल्यांसाठी शाळा असो की गुजरातमधील भूकंप, नैसर्गिक आपत्तीच्या काळात लोकमतने नेहमीच मदतीचा हात नेहमीच पुढे केला आहे. राज्यव्यापी रक्तदान शिबिराचे आयोजन करून लोकमतने सामाजिक बांधिलकीशी नाते जपले आहे. कोरोना काळात हे ‘रक्ताचे नाते’ खूप महत्त्वाचे आहे. कारण आज राज्यात रक्ताचा तुटवडा आहे. लोकमतच्या या सामाजिक उपक्रमास सलाम, असे गौरवोद्गार राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काढले. रक्तदान महायज्ञास आरोग्य विभागाचे पूर्णत: सहकार्य लाभेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Web Title: The state-level Mahayagya of blood donation was ignited by the blood of hundreds of donors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.