निधीसाठी राज्य शिखर बँक अनुकूल
By Admin | Published: July 14, 2017 12:13 AM2017-07-14T00:13:41+5:302017-07-14T00:16:29+5:30
परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शिखर बँकेकडे कर्ज स्वरुपात निधीची मागणी केली असून हा निधी देण्यास शिखर बँकेने अनुकूलता दर्शविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शिखर बँकेकडे कर्ज स्वरुपात निधीची मागणी केली असून हा निधी देण्यास शिखर बँकेने अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तातडीच्या कर्ज वाटपाचा प्रश्न निकाली निघाला आहे. शेतकऱ्यांनी तातडीच्या कर्जासाठी सेवा सोसायट्यांकडे कर्ज मागणी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी लक्षात घेऊन राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ या दरम्यान पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज माफ केले आहे. दरम्यान, कर्ज माफीच्या घोषणेबरोबरच १४ जुलै रोजी राज्य शासनाने एक अद्यादेश काढून शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यासाठी बँकांमधून दहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. थकबाकीदार शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने शासनाच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना तातडीचे दहा हजार रुपये देणे शक्य होणार नाही. त्यामुळे परभणी जिल्हा बँकेला शेतकऱ्यांच्या कर्जासाठी निधीचा पुरवठा करावा, अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती बँकेने, राज्य शिखर सहकारी बँकेकडे एका पत्राद्वारे केली होती. ही मागणी करताना शासनाच्या कर्ज माफीचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांचा अंदाजीत आकडा आणि त्यांना देण्यासाठी लागणारी रक्कम देखील जिल्हा बँकेने शिखर बँकेला कळविली होती. परंतु, हा निर्णय प्रलंबित होता. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना १० हजार रुपयांप्रमाणे तातडीची मदत देण्याचे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात आतापर्यंत बँकेमार्फत ही मदत दिली गेली नव्हती. गुरुवारी राज्य शिखर बँकेने जिल्हा बँकेचा प्रस्ताव तत्वत: मंजूर करण्यास अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेमार्फत आता शेतकऱ्यांना १० हजार रुपयांची तातडीची मदत दिली जाणार आहे. तातडीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांनी विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडे मागणी अर्ज जमा करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर, जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राम खरटमल, जिल्हा बँकेचे सीईओ जाधव यांनी केले आहे.