‘ॲडिनो व्हायरस’मुळे राज्यभर डोळ्यांची साथ; काय आहेत लक्षणे? अशी घ्या काळजी
By मुजीब देवणीकर | Published: August 2, 2023 01:02 PM2023-08-02T13:02:24+5:302023-08-02T13:04:32+5:30
डोळे येणे हा संसर्गजन्य रोग, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधी डोळ्यात टाकावी.
छत्रपती संभाजीनगर : शहरात काळा चष्मा लावून फिरणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. ॲडिनो व्हायरसमुळे डोळ्याच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मागील चार दिवसांत ११९२ जणांना लागण झाली. मंगळवारी एकाच दिवसात पालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रातील नोंदींनुसार लागण झालेले २८६ रुग्ण उपचारासाठी आले होते.
डोळे येण्याची साथ राज्यभर पसरली आहे. शहरातही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शासनाच्या आदेशानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने डोळे आलेल्या व्यक्तींची रोजच्या रोज नोंद ठेवणे सुरू केले आहे. महापालिकेची ४० आरोग्य केंद्रे व रुग्णालयांमध्ये ही नोंद ठेवली जात आहे. चार दिवसांपासून रुग्णांची नोंद ठेवण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी एका स्वतंत्र आरोग्य अधिकाऱ्याची कार्यक्रम अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दिवसभरात डोळ्याच्या साथीचे नवीन २८६ रुग्ण आढळून आले.
डोळे येण्याची लक्षणे :
डोळे लाल होणे.
वारंवार पाणी गळणे.
डोळ्यांना सूज येणे.
काही वेळा डोळ्यातून चिकट द्रव पदार्थ बाहेर पडणे.
डोळ्यांना खाज सुटते.
डोळे जड वाटतात व डोळ्यात काही तरी गेल्यासारखे वाटते.
अशी काळजी घ्या:
डोळ्याला स्वच्छ पाण्याने सतत धुणे.
इतरांचा रुमाल, टॉवेल, कपड्याने डोळे पुसू नये.
डोळ्यांना सतत स्पर्श करू नये.
घराबाहेर जाताना गॉगल वापरा.
संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्र तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.
शाळा, वसतिगृहे, अनाथालय अशा संस्थात्मक ठिकाणी साथ असेल तर रुग्णाला वेगळे ठेवा.
डोळे येणे हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे एकापासून दुसऱ्याने अंतर ठेवून राहावे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधी डोळ्यात टाकावी.
डोळे आल्यानंतर स्टेरॉइड, आय ड्रॉपचा वापर टाळावा.