मराठा मोर्चासंदर्भात रविवारी औरंगाबादेत राज्यव्यापी बैठक
By Admin | Published: October 8, 2016 01:06 AM2016-10-08T01:06:36+5:302016-10-08T01:16:16+5:30
औरंगाबाद : मुंबईमध्ये काढण्यात येणाऱ्या विक्रमी मराठा क्रांती मोर्चाच्या तयारीसाठी रविवारी औरंगाबादमध्ये राज्यव्यापी नियोजन बैठक होत आहे.
औरंगाबाद : मुंबईमध्ये काढण्यात येणाऱ्या विक्रमी मराठा क्रांती मोर्चाच्या तयारीसाठी रविवारी औरंगाबादमध्ये राज्यव्यापी नियोजन बैठक होत आहे. एमजीएमच्या रुख्मिणी सभागृहात सकाळी १० वाजता ही बैठक सुरू होणार आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत काढण्यात येणाऱ्या मोर्चासंदर्भात चर्चा सुरू आहे. मुंबईत ३० सप्टेंबर रोजी झालेल्या राज्यव्यापी बैठकीमध्ये औरंगाबादमध्ये बैठक घेण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार ९ आॅक्टोबर रोजी शहरात बैठक होत आहे. ही बैठक आयोजित करीत असताना प्रत्येक जिल्ह्यातील समन्वयकांशी चर्चा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सर्व जिल्ह्यातील आयोजकांनी आपापल्या जिल्ह्यांत बैठका घेऊन औरंगाबादच्या बैठकीमध्ये प्रत्येक जिल्ह्यातून केवळ अकरा प्रतिनिधी पाठविण्याचे नियोजन केले आहे. या बैठकीमध्ये मुंबई येथे काढण्यात येणाऱ्या विक्रमी मोर्चासंदर्भात तसेच मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात एकमत करण्यात येऊन त्याबाबत एक अहवाल तयार करण्यात येणार आहे. हा अहवाल सर्वांसमक्ष वाचून दाखविण्यात येईल. या बैठकीतच मुंबईतील मोर्चाच्या तारखेबाबत एकमत करण्यात येणार आहे. बैठकीमध्ये विविध जिल्ह्यांतून येणाऱ्या प्रतिनिधींना ओळखपत्र देण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील आयोजकांतर्फे सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींची नावे आधी कळविण्यात आली आहेत. त्यानुसारच बैठकीचे नियोजन करण्यात आले असल्याचे बैठकीच्या समन्वयकांनी म्हटले आहे. बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती नंतर माध्यमांना दिली जाणार आहे. दरम्यान, या बैठकीत मुंबई येथील मोर्चाची अंतिम तारीख ठरण्याची शक्यता आहे.