शिवरायांचा पुतळा : मनपाने नाही, तर बाजार समितीने करून दाखविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 07:22 PM2020-08-11T19:22:38+5:302020-08-11T19:25:25+5:30
एक कोटी रुपये खर्च करून नवीन पुतळा घेण्याचे निश्चित करण्यात आले. या सर्व प्रक्रियेत अडीच वर्षे कधी निघून गेले
औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा क्रांतीचौक येथे नवीन पद्धतीने उभारण्याचा निर्णय तब्बल अडीच वर्षांपूर्वी औरंगाबाद महापालिकेने घेतला होता. मागील अडीच वर्षांमध्ये महापालिकेला पुतळ्याच्या कामात किंचितही प्रगती करता आलेली नाही. त्यामुळे तमाम शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महापालिकेला जे जमले नाही ते औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीने अवघ्या सहा महिन्यांमध्ये करून दाखविले. सहा महिन्यांत शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून मागील महिन्यात त्याचे लोकार्पणही करण्यात आले.
क्रांतीचौक येथे उड्डाणपूल उभारण्यात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा खाली दिसू लागला. तेव्हापासून शिवप्रेमींनी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवावी, अशी मागणी लावून धरली होती. तीन वर्षांपूर्वी शहरातील शिवप्रेमींसह मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेत येऊन महापौरांना घेराव घातला होता. महापालिकेकडे निधी नसेल तर तसे सांगून टाकावे शिवप्रेमी स्वत:च्या खिशातील पैसे लावून पुतळ्याची उंची वाढवतील, असेही सांगण्यात आले होते. त्यावेळी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी हा विषय अस्मितेचा समजून महापालिका स्वत: पैसा खर्च करेल, असे आश्वासन दिले होते. पुतळ्याची उंची वाढविण्याचा निर्णय झाला. निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. कंत्राटदार निश्चित करण्यात आला. मोठा गाजावाजा करीत महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी भूमिपूजनही केले. मात्र, त्यानंतर कामामध्ये कोणतीही प्रगती दिसून आली नाही. एकीकडे कंत्राटदार काम करण्यास तयार नाही, तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नवीन बसवण्यात यावा, असा निर्णय घेण्यात आला. नवीन पुतळ्यासाठी पुन्हा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.
एक कोटी रुपये खर्च करून नवीन पुतळा घेण्याचे निश्चित करण्यात आले. या सर्व प्रक्रियेत अडीच वर्षे कधी निघून गेले, हे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनाही कळाले नाही. मागील आठवड्यात मराठा क्रांती मोर्चा आणि शहरातील शिवप्रेमींनी पुन्हा एकदा महापालिकेवर जोरदार हल्लाबोल केला. पुतळ्याचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार, असा जाब विचारण्यात आला. त्यानंतर महापालिकेला जाग आली. कंत्राटदाराला वेळोवेळी बिल अदा करण्याचे आश्वासन देऊन कामाला सुरुवात करण्यात आली.
निर्णय वेळोवेळी बदलले, निधीची कमतरता
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या कामाला अडीच वर्षे पूर्ण झाले, ही वस्तुस्थिती आहे. कामास विलंब होण्यास अनेक कारणे आहेत. या कामामध्ये वेळोवेळी निर्णय बदलत गेले. त्याचप्रमाणे महापालिकेत निधीची कमतरता होती. आता कोणताही अडथळा या कामात येणार नाही. काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येईल.
- एस.डी. पानझडे, शहर अभियंता, महापालिका.
असे झाले बाजार समितीत काम
शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी संचालक मंडळाने डिसेंबर २०१८ ला निर्णय घेतला. १७ मे २०१९ रोजी पुतळा बनविण्यासाठी शिल्पकाराला आॅर्डर दिली. १० जून २०१९ रोजी राज्य सरकारच्या परवानगीसाठी प्रस्ताव दाखल केला. कला संचालनालयाची ९ डिसेंबर १९ रोजी परवानगी मिळाली. त्यानंतर २३ डिसेंबर २०१९ रोजी पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांनादेखील मंजुरीसाठी प्रस्ताव दिला. राज्य शासनाची परवानगी १० जून २०२० रोजी मिळाली. लॉकडाऊनमुळे या कामाला जवळपास ४ महिने उशीर झाला.
- राधाकिसन पठाडे, (माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती.)