मुद्रा कर्जाचा अर्जही मिळेना, औरंगाबादमधील स्थिती; बँकांना कर्जफेड न होण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 05:23 AM2017-12-09T05:23:26+5:302017-12-09T05:23:41+5:30
प्रधानमंत्री मुद्रा योजनेची ‘गरजेनुसार कर्ज, अपेक्षेनुसार प्रगती’ अशी जाहिरात केली जात असली तरी येथे मुद्रा कर्ज योजनेचा अर्जही देण्यास बँकेचे अधिकारी टाळाटाळ करीत आहेत.
औरंगाबाद : प्रधानमंत्री मुद्रा योजनेची ‘गरजेनुसार कर्ज, अपेक्षेनुसार प्रगती’ अशी जाहिरात केली जात असली तरी येथे मुद्रा कर्ज योजनेचा अर्जही देण्यास बँकेचे अधिकारी टाळाटाळ करीत आहेत.
बेरोजगार युवक बँकांमध्ये खेटे मारून वैतागले आहेत. काहींनी तर कर्ज घेण्याचा विचारही सोडला आहे. बँक आॅफ महाराष्ट्रकडे जिल्हा व शाखानिहाय कर्जवाटप केल्याची माहिती उपलब्ध नाही.
सुरवातीला दोन वर्ष बँकांकडून मुद्रा कर्ज पुरवठा केला; पण नंतर कर्ज सोडाच; अर्जही देण्यास टाळाटाळ केली जात आहे. नुकतीच जिल्हाधिकाºयांनी मुद्रा बँक योजना समन्वय समितीची बैठक घेतली. त्यात किती बँकांनी मुद्रा कर्ज वाटप केले, त्याची माहिती मिळाली नाही. यासंदर्भात अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक प्रदीप कुतवळ यांनी औरंगाबाद जिल्ह्याऐवजी, राज्याची एकूण आकडेवारी सांगितली.
राज्यात १६ हजार १८१ कोटी रुपयांचे कर्जवाटप
राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांचे मिळून शिशू योजनेंतर्गत १५ लाख ९६ हजार ९९५ खातेदारांना एकूण ३ हजार ९३६ कोटी ७५ लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले. किशोर योजनेंतर्गत १ लाख ८ हजार १६३ खातेदारांना ९ हजार ६४० कोटी ६० लाख, तर तरुण योजनेत ३५ हजार २०८ खातेदारांना २ हजार ६०४ कोटी ९५ लाख रुपये, असे एकूण १६ हजार १८१ कोटी ३० लाखांचे मुद्रा कर्ज वाटप केले आहे.
गुरुवारी बँक आॅफ बडोद्याच्या बजरंग चौक शाखेत गेलो होतो. मुद्रा कर्ज योजनेचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. अशी उत्तरे तेथील अधिकाºयांनी दिली. मागील आठवडाभरापासून अन्य पाच राष्ट्रीयकृत बँकेतही असे उत्तर मिळाले.
- विनोद बनकर, बेरोजगार युवक
कर्जवाटपाचे उद्दिष्टच नाही
मुद्रा कर्जाचे वर्षभरात किती वाटप करायचे याचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले नाही. तरीही आमचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याची खोटी माहिती नागरिकांना दिली जात आहे. कर्ज बुडविले जाईल या भीतीने बँका अर्ज देत नाहीत. यात प्रामाणिक व गरजूंनाही कर्ज मिळेनासे झाले आहे. कर्ज सोडाच; पण अर्जही बँक देत नसून याची तक्रार आम्ही पंतप्रधान कार्यालयाकडे केली आहे. - राजेश मेहता, मुद्रा योजना संयोजक (भाजपा)