एएमआरडीएला नगरविकास विभागाचा विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा; क्षेत्रात येणार्या गावांच्या हद्द ठरल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 02:50 PM2018-02-03T14:50:31+5:302018-02-03T14:51:28+5:30
एएमआरडीएला (औरंगाबाद महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) नगरविकास विभागाने विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिला आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ४० (१ घ) नुसार नियोजन प्राधिकरण म्हणून नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे.
- विकास राऊत
औरंगाबाद : एएमआरडीएला (औरंगाबाद महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) नगरविकास विभागाने विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिला आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ४० (१ घ) नुसार नियोजन प्राधिकरण म्हणून नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. वर्षभरापूर्वी एएमआरडीएला शासनाने मंजुरी दिली; परंतु नगररचना नियमानुसार विकास परवानग्यांचे अधिकार दिले नव्हते. त्यामुळे महानगर हद्दीतील बहुतांश गावांतील अकृषक परवानग्यांना ब्रेक लागला होता. नगरविकास खात्याने प्राधिकरणास मंजुरी देत त्याअंतर्गत येणार्या गावांची हद्द, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशेकडील सीमांकनदेखील जाहीर केले आहे.
प्रभारी महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांना याबाबत गेल्या आठवड्यात शासनाने प्राधिकरण मंजुरीबाबत कळविले आहे. औरंगाबाद महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे क्षेत्र जिल्ह्यातील औरंगाबाद मनपा, खुलताबाद नगरपालिका, छावणी परिषद क्षेत्र, औरंगाबाद, गंगापूर, पैठण, फुलंब्री, खुलताबाद तालुका (भागश:) प्राधिकरणाच्या सीमेमध्ये आला आहे.
एएमआरडीएच्या हद्दीत आलेले क्षेत्र
पूर्वेकडील हद्द : औरंगाबाद तालुक्यातील लामकाना गावाची उत्तर व पूर्व सीमा, गेवराई खुबरी, बनेगाव, जयपूर, करमाड, मंगरूळ, महंमदपूर, एकलहरा, पिंपरी बुद्रूक या गावांची पूर्व सीमा, तसेच अंबिकापूर गावाची पूर्व व दक्षिण सीमा, शहापूर गावाची दक्षिण सीमा, पिंपळगाव पांढरी गावाची पूर्व सीमा प्राधिकरणाची हद्द आहे.
पश्चिमेकडील हद्द : गंगापूर तालुक्यातील राजारा, मलकापूर, बोरगावची पश्चिम सीमा, देरडा गावची पश्चिम व उत्तर सीमा, गोविंदपूर, रांजणगाव पोळ, एक दुरडी, वाघळगावची पश्चिम सीमा, शहनवाजपूर गावाची पश्चिम व उत्तर सीमा, पोटूळ, टाकळीवाडी गावाची पश्चिम सीमा, पाचपीरवाडी गावाची दक्षिण सीमा, देवळी, खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा व वेरूळची पश्चिम सीमा आता प्राधिकरणाची हद्द असेल.
दक्षिणेकडील हद्द: औरंगाबाद तालुक्यातील पांढरी गावाची दक्षिण सीमा, काद्राबादची दक्षिण सीमा, बेंबळवाडी, जोडवाडीची पूर्व सीमा, कचनेर तांड्याची पूर्व व दक्षिण हद्द, कचनेर गावाची दक्षिण हद्द, पैठण तालुक्यातील पारेगाव, गाजीपूर गावांची दक्षिण सीमा, नांदलगावची पूर्व व दक्षिण सीमा, कौडगाव, सोमपुरी, गिधाडा,शेकटा,रांजणी,रांजणगांव खुरी या गावांची दक्षिण सीमा, गंगापूर तालुक्यातील धामोरी बुद्रूकची दक्षिण व पश्चिम सीमा, अंतापूर, चांडिकपूर, टेंभापुरी गावांची पश्चिम सीमा, रहीमपूर, सुलतानपूर गावांची दक्षिण सीमा प्राधिकरणाचा भाग असेल.
उत्तरेकडील हद्द: खुलताबाद तालुक्यातील म्हैसमाळ गावाची पश्चिम व उत्तर सीमा, लामणगाव, ममनापूर गावाची उत्तर सीमा, वीरमगावची पश्चिम व उत्तर सीमा, माटरगाव, महंमदपूर, वडोद खुर्द, येसगावची उत्तर सीमा, तसेच फुलंब्री तालुक्यातील जानेफळ गावाची पश्चिम व उत्तर सीमा, वानेगाव बुद्रुक व खुर्दची पश्चिम व उत्तर सीमा, पिंपळगाव देव, म्हसाळा, फुलंब्री, दरेगाव, धामणगाव या गावांची उत्तर सीमा, वाघोळा गावची पूर्व हद्द, औरंगाबाद तालुक्यातील डोणवाडा, बोरवाडीची पूर्व सीमा, तर आडगाव सरकची उत्तर सीमा यापुढे प्राधिकरणाच्या हद्दीत असेल.
जिल्हाधिकार्यांच्या अधिकारावर गदा
जिल्हाधिकार्यांच्या अधिकारांवर या मंजुरीमुळे गदा आली आहे. प्राधिकरणाला कायदेशीर अधिकार दिल्यामुळे जिल्हा नगररचना विभागामार्फत देण्यात येणार्या एनए परवानग्यांना जिल्हाधिकारी मंजुरी देत. आता महानगर आयुक्त या परवानग्यांना मंजुरी देतील; परंतु प्राधिकरणाचे स्वतंत्र कार्यालय सुरू झाल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल, तोपर्यंत सहायक संचालक नगररचना आणि जिल्हाधिकार्यांमार्फत परवानग्या दिल्या जातील.