'जागते रहो...' कैलास मानसरोवर यात्रेच्या नावाखाली नेपाळचे एजंट जमविताहेत ‘गल्ला’
By संतोष हिरेमठ | Published: April 6, 2023 08:09 PM2023-04-06T20:09:36+5:302023-04-06T20:09:53+5:30
खात्री करा, नाहीतर पश्चात्ताप; कैलास मानसरोवर यात्रा सुरू होण्याचे संकेत नसताना बुकिंग, थोडं थांबा, नाही तर फसाल
छत्रपती संभाजीनगर : कैलास मानसरोवर यात्रा कोरोना काळापासून बंद आहे. ही ‘यात्रा चालू झाली’, ‘लवकरच सुरू होणार आहे’, असे सांगत नेपाळचे एजंट बुकिंग करून ‘गल्ला’ जमवित आहेत. अशाच काही एजंटांशी फोनवर संपर्क साधून ‘लोकमत’ने संवाद साधला. तेव्हा एजंटांनी सारवासारव करीत थेट फोन बंद करून टाकले. त्यामुळे यात्रेला जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज आहे.
कैलास मानसरोवर यात्रेला ऐतिहासिक, धार्मिक आणि पौराणिक महत्त्व असल्याने दरवर्षी हजारो भाविक याला भेट देत असतात. ही यात्रा कोविड काळापासून बंद आहे. असंख्य भाविक ही यात्रा सुरू होण्याची वाट पाहत आहेत. या सगळ्यात सध्या ही यात्रा चालू झाली आहे, असे काही जणांकडून सांगण्यात येत आहे. कैलास मानसरोवर यात्रा नेपाळमार्गे असंख्य ट्रॅव्हल एजन्सी चालवतात. शासनाने परवानगी दिली तरीही ही यात्रा जुलैनंतर सुरू होऊ शकेल, पण त्याचे नियम काय असतील, सीमेवर आरटीपीसीआर तपासणी होईल का, क्वाॅरंटाईन करणार का, हे काहीही स्पष्ट नसताना काहींनी बुकिंग सुरू केली आहे.
खात्री करा, नाहीतर पश्चात्ताप
ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ छत्रपती संभाजीनगरचे मंगेश कपोते म्हणाले, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ छत्रपती संभाजीनगरमार्फत सर्व भाविकांना आवाहन आहे की, अशा प्रचाराला बळी पडू नये. जर आपण बुकिंग कराल तर आपली फसवणूक होईल. आपले पैसे अडकून पडतील. जर बुकींग केली असल्यास आपली यात्रा निश्चित तारखेस न गेल्यास कंपनी पैसे परत करणार आहे का, नुकसान भरपाई देणार का, याची खात्री करून घ्यावी. संबंधित एजन्सी ही अधिकृत आहे का ? तसेच जीएसटी रजिस्टर्ड आहे का? नेपाळच्या पुढे कैलास यात्रा घेऊन जाणारी कंपनी ‘एकेटीओएन’ मेंबर आहे का ? याचीही खात्री करावी.
एजंटाशी झालेला संवाद
प्रतिनिधी : कैलास मानसरोवर यात्रेसाठी बुकिंग करायची आहे.
एजंट : मोबाईल नंबर कोणाकडून मिळाला, हे सांगा?
प्रतिनिधी : तुमच्या सहकाऱ्यांकडूनच मिळाला?
एजंट : बुकिंगविषयी, यात्रेविषयी आता काही सांगता येणार नाही.
इतका संवाद झाल्यानंतर एजंटाने फोन बंद करून टाकला. दुसऱ्या नंबरवरही संपर्क साधला. परंतु तो नंबरदेखील बंद करून टाकण्यात आला.