बोगस लोकांपासून दुर रहा, शरिराचे जास्त लाड करु नका: भारत गणेशपुरे
By योगेश पायघन | Published: October 19, 2022 07:32 PM2022-10-19T19:32:17+5:302022-10-19T19:32:54+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचा समारोप व पारितोषिक वितरण सृजनरंग समारंभ बुधवारी थाटात अन् जल्लोषात पार पडला.
औरंगाबाद : ‘युवक महोत्सव ही एक नशा असते. कला आणि कलाकारांचे मुल्यमापन होऊ शकत नाही. कलाकारांच्या बायोडाटावर जात नसते. आपला भाग समृद्ध करण्यासाठी कलाकारही लागतो. जे यश दुर होतं ते मकरंदमुळे जवळजवळ आलं. बोगस लोकांपासून दुर रहा. शरिराचे जास्त लाड करु नका. हे शरीर देवाच्या घरुन आणलेलं भाड्याचे बैल आहे हे वाक्य लक्षात ठेवा. असे अभिनेते भारत गणेशपुरे म्हणाले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचा समारोप व पारितोषिक वितरण सृजनरंग समारंभ बुधवारी थाटात अन् जल्लोषात पार पडला. त्यावेळी ते बोतल होते, गणेशपुरे म्हणाले, ‘काम करत रहा. फक्त प्रेमात पडू नका. म्हणजे कलाकृती, बक्षीसाच्या प्रेमात पडू नका. जे प्रेमात पडतात, ते तिथेच राहतात. अभिनय क्षेत्रात काम करायचे असेल तर विद्यापीठ गेट बाहेर पडल्यावर इथे काय शिकलो ते विसरुन जा. ते शिकवणीचं गाठोडे वेळ आले तेव्हा वापरा. मनासारखं पण शिस्तीत जगा.’ प्रकुलगुरू डॉ श्याम शिरसाठ यांनी मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविकात डॉ संजय सांभाळकर यांनी केले. यावेळी वृत्तसाधनाच्या अंकाचे विमोचन झाले. सूत्रसंचालन विनोद जाधव यांनी केले. आभार कुलसचिव डाॅ. भगवान साखळे यांनी मानले. मंचावर संयोजन सल्लागार समिती सदस्य डॉ.आनंद देशमुख, प्रा. संभाजी भोसले, प्राचार्य डॉ.जयंत शेतवेकर, डॉ.दासू वैद्य, डॉ.मुस्तजिब खान, डॉ.शिरीष अंबेकर, डॉ.हंसराज जाधव, डॉ.विद्या प्रधान, डॉ.शिवाजीराव देशमुख, डॉ.संजय पाटील देवळाणकर, डॉ.भारती पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती
कलाकारांचा बालेकिल्ला बीड जिल्हा....
अभिनेते सुहास शिरसट यांच्या जीवन प्रवासाची गणेश शिंदे यांनी बनवलेली दृष्यफित दाखवण्यात आली. त्यावेळी शिरसट यांच्या डोळ्यात पाणी आले. आठवणींना उजाळा देतांना त्यांच्या जीवनप्रवासाच्या या मनोगताने सभागृह भारावून गेले होते. याच दरम्यान बीडच्या भूमिपुत्राचे स्वागत म्हणून कलाकारांचा बालेकिल्ला बीड जिल्हा, बीड जिल्हा अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले.
स्वतःला फसवू नका : सुहास सिरसाट
सिने अभिनेते सुहास सिरसाट म्हणाले, ‘युवक महोत्सवाने मला अभिनयाचा आत्मविश्वास दिला. तर वेळेचं भान गुरूंनी दिले. लहानपणी काळ्या म्हटलं तर राग येत होता. पण आज याच रंगाचे मार्केट आहे. निगेटिव्ह पॉईंट बाजूला करून पॉझिटिव्ह पॉईंट घेऊन पुढे गेलो. टॅलेंट दाखवलं तर यशाला पर्याय नसतो. चार वर्षे नाटकं केल्याने काम मिळाले. २० वर्षांपूर्वी समोर प्रेक्षकात बसलो होतो. आज स्टेजवर उभा आहे. हे एकट्याचे नाही. गुरुजन आणि मित्रांच्या साथीने शक्य झाले. कुटुंबियांनी साथ दिली म्हणून आयुष्याला बारावी नापास झाल्यावर कलाटणी मिळाली. कामाशी प्रामाणिक रहा. स्वतःला फसवू नका. घरच्यांना विश्वासात घ्या. १८ वर्षांपासून काम करतोय पण अजूनही स्ट्रगल सुरू आहे. चांगला नट अन् माणूस बनण्याचा प्रयत्न सुरु आहे. अशी प्रांजळ कबुली यावेळी सिरसट यांनी दिली.
दिलगीरी, दंड अन् सुधारणा : कुलगुरू
अध्यक्षीय समारोपात कुलगुरु डॉ. प्रमोद येवले म्हणाले, ‘परीक्षेचा अभ्यासक्रम दरवर्षी बदलतो. मात्र आयुष्यात जीवनाचा अभ्यासक्रम दररोज बदतो. संघर्षमय जीवनाची परीक्षा यशस्वी व्हा. अनासपुरे आणि गणेशपुरे यांनी नाव भाषा बदलली नाही, तरीही त्यांनी त्यांच्या भाषेतील कलेला राजाश्रय मिळवून दिला. युवक महोत्सावात नोंदणी केलेल्या २४७ पैकी १८९ महाविद्यालयानी सहभाग नोंदवला. तर ५८ संघ सहभागी झाले नाही. तर महोत्सवात सहभागी न घेणाऱ्या महाविद्यालयांना आर्थिक दंड व अॅकडमिक ऑडीट मध्ये गुण वजा करू. पुढच्या वर्षी एप्रिल मध्येच महोत्सवाचे वेळापत्रक तयार करू. नियोजनात विद्यापीठ प्रशासन कमी पडले. त्यामुळे विद्यार्थ्यी परीक्षकांची जेवणाची गैरसोय झाली. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. माध्यमांनी उणिवा दाखवल्याने त्या आम्ही सुधारल्याने त्यांचेही आभार मानतो.’