‘स्पेशल इंट्रेस्ट टूर’ने वाढतोय पर्यटननगरी छत्रपती संभाजीनगरात मुक्काम; परिसरातही भटकंती वाढली
By संतोष हिरेमठ | Published: December 28, 2023 11:16 AM2023-12-28T11:16:21+5:302023-12-28T11:20:02+5:30
अजिंठा, वेरुळ, बीबी का मकबऱ्यापाठोपाठ इतर स्थळांकडे वळताहेत पर्यटकांची पावले
छत्रपती संभाजीनगर : ‘एसआयटी’ म्हटले की अनेकांची घाबरगुंडी उडते. पर्यटननगरी छत्रपती संभाजीनगरसाठी मात्र ‘एसआयटी’ फायदेशीर ठरू पाहत आहे. ही ‘एसआयटी’ काही चौकशीसाठी नसून, पर्यटन वाढीला हातभार लावणारी आहे. ‘स्पेशल इंट्रेस्ट टूर’ (एसआयटी) ही संकल्पना राबविली जात असून, त्यातूनच पर्यटननगरीत पर्यटकांचा मुक्काम २ ते ३ दिवसांवरून आता ७ दिवसांपर्यंत वाढत आहे.
पर्यटननगरी छत्रपती संभाजीनगरमध्ये यायचे आणि अजिंठा, वेरुळ लेणी, बीबी का मकबरा पाहून परत जायचे, असेच काहीसे नियोजन असते. त्यामुळे २ ते ३ दिवसांत पर्यटक शहरातून रवाना होतात. मात्र, शहरातील इतर स्थळांकडे पर्यटकांना वळविण्यात येत असून, त्यातून पर्यटकांचा मुक्काम ७ दिवसांपर्यंत वाढण्यास हातभार लागत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून ‘स्पेशल इंट्रेस्ट टूर’’ यास प्रोत्साहन देण्यात येत आहे. याअंतर्गत ऐतिहासिक स्थळांच्या अभ्यासाच्या दृष्टीने येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे, असे ‘एमटीडीसी’चे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल म्हणाले.
काय आहे ‘एसआयटी’त?
केवळ छायाचित्र काढून रवाना होण्यापेक्षा प्रत्येक स्थळाची अभ्यासपूर्ण माहिती घेण्यावर भर दिला जात आहे. यात अजिंठा, वेरुळ, बीबी का मकबऱ्यासह शहरातील बीबी का मकबरा, बुद्ध लेणी, ऐतिहासिक दरवाजे, पाणचक्की, नहर, सोनेरी महाल, सोनेरी महाल परिसरातील लाला हरदौल चबुतरा (समाधी) आदी स्थळांना पर्यटक भेटी देत आहेत.
प्रत्येक स्थळ महत्त्वाचे
अजिंठा, वेरुळ लेणीशिवाय येथील प्रत्येक स्थळ महत्त्वाचे आहे. शहरातील अनेक ऐतिहासिक दरवाजे चांगल्या स्थितीत आहे. तेही पाहण्यासारखे आहेत. ‘स्पेशल इंट्रेस्ट टूर’च्या माध्यमातून ऐतिहासिक स्थळांच्या अभ्यासाच्या दृष्टीने आम्ही २८ जण या पर्यटननगरीत आलो.
- रमीन खान, दिल्ली.
शहराविषयी इतरांना सांगेल
छत्रपती संभाजीनगरचे नाव ऐकले होते. आता प्रत्यक्ष या ऐतिहासिक शहराला पाहता आले. येथील स्थळांविषयी, त्यांच्या इतिहासाविषयी माहिती घेताना खूप रोमांचक वाटले. या शहराविषयी मी इतरांनाही नक्की सांगेन.
- रवींद्रसिंग परिहार, दिल्ली
पर्यटननगरीत महिन्याला किती पर्यटक?
स्थळ- भारती पर्यटक- परदेशी पर्यटक
वेरुळ लेणी - १, ५४, ५१२-७५३
अजिंठा लेणी -४८,६०८-५४०
बीबी का मकबरा- १,००,११६-३१७
देवगिरी किल्ला (दौलताबाद)- ५७,६६९-१८२
बुद्ध लेणी - १६, ६१५-५३