प्रेयसींना ‘इम्प्रेस’ करण्यासाठी ३०० मोबाइलची चोरी; ३ अल्पवयीन मित्रांचा कारनामा
By सुमित डोळे | Published: July 13, 2023 01:45 PM2023-07-13T13:45:11+5:302023-07-13T13:45:40+5:30
मुकुंदवाडी पोलिसांकडून तीन अल्पवयीन ताब्यात; चोवीस तासांत ३८ मोबाइल हस्तगत
छत्रपती संभाजीनगर : प्रेयसींना ‘इम्प्रेस’ करण्याच्या नादात अल्पवयीन मित्रांनी सुसाट माेबाइल चोरी सुरू केली. मुकुंदवाडीच्या गेट क्र. ५६ जवळ रेल्वेचा वेग मंदावताच दरवाजातील प्रवाशाचा मोबाइल खाली पाडून चोरायचे. असे एक दोन नाही तर ३०० पेक्षा अधिक मोबाइल त्यांनी चाेरले. मंगळवारी रंगेहाथ पकडल्यानंतर प्राथमिक चौकशीत चोरीचे ३८ मोबाइल मिळवण्यात मुकुंदवाडी पोलिसांना यश आले.
मुकुंदवाडी पाेलिस ठाण्याचे उपनिरीक्षक पंकज मोरे यांना तिघे मोबाइल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या सूचनेवरून मोरे यांनी रेल्वेस्थानकात सापळा रचला. तिघे येताच त्यांना ताब्यात घेतले. तेव्हा नुकतेच चोरलेले तीन मोबाइल आढळून आले. मोरे यांच्यासह नरसिंग पवार, बाबासाहेब कांबळे, अनिल थोरे, अंमलदार अनिल थोरे, गणेश वाघ, योगेश बावस्कर, अनिल कोमटवार, सुभाष राठोड, शैलेश अडियाल, दिनेश राठोड, प्रभाकर पाटील यांनी ही कामगिरी केली.
सायंकाळी सक्रिय
रेल्वेतून प्रवाशांचे मोबाइल चोरीला जाण्याचे प्रमाण काही दिवसांमध्ये वाढले होते. उस्मानपुरा ते चिकलठाण्याच्या तीन स्थानकांदरम्यान रेल्वेचा वेग मंदावतो. याच दरम्यान सायंकाळी येणाऱ्या रेल्वेतील प्रवाशांना लक्ष्य केले जाई. एक चोर लांबून हातात मोबाइल असलेला प्रवासी हेरून पुढच्या दोघांना इशारा करे. मग एकजण तयार राहून काठीने हाताला झटका मारत मोबाइल खाली पाडून त्याचा झेल पकडत पसार होई. स्थानकावर झोपलेल्यांचे देखील ते मोबाइल लंपास करत.
मोबाईल ५५ हजारांचा, विक्री पाच हजारांत
आरोपींमध्ये दोघे १७, तर एक १६ वर्षांचा आहे. वडील खासगी नोकरी तर आई, भाऊ केटरिंगमध्ये काम करतात. तिघेही नावाला विद्यार्थी असून, प्रत्येकाला एक, दोन मैत्रिणी आहेत. त्यांच्यावर पैशांची उधळण करणे, महागडे मोबाइल दाखवून ‘इम्प्रेस’ करण्याचा छंद त्यांना जडला. शहरात ३८ मोबाइल विकले. इतर मोबाइल बीड, नांदेडच्या विक्रेत्यांना त्यांनी विकले. नुकताच लाँच झालेला एक ५५ हजारांचा मोबाइल त्यांनी अवघा ५ हजारांत एका मजुराला विकला.