खाजगी ट्रॅव्हल्सच्या स्पर्धेत आता स्टील बॉडीची एसटी
By Admin | Published: July 17, 2017 12:56 AM2017-07-17T00:56:20+5:302017-07-17T00:59:41+5:30
औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या चिक लठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत प्रायोगिक तत्त्वावर पाच स्टील बॉडीच्या (माइल्ड स्टील) परिवर्तन बसची बांधणी केली जाणार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या चिक लठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत प्रायोगिक तत्त्वावर पाच स्टील बॉडीच्या (माइल्ड स्टील) परिवर्तन बसची बांधणी केली जाणार आहे. यासाठी काही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, साहित्यांची जुळवाजुळव केली जात आहे. सध्याच्या अॅल्युमिनियम बसपेक्षा स्टील बॉडी बस अधिक मजबूत राहतील. खाजगी ट्रॅव्हल्सशी स्पर्धा करण्यासह अपघातात जीवित हानी टळण्यासाठी ही बस महत्त्वपूर्ण
ठरणार आहे.
कार्यशाळा व्यवस्थापकपदाचा यू. ए. काटे यांनी शनिवारी (दि.१५) पदभार स्वीकारला. एसटी महामंडळाच्या पुण्यातील दापोडी कार्यशाळेत पहिल्या स्टील बसची बांधणी करण्यात आली आहे. यामध्ये यू. ए. काटे यांचा महत्त्वपूर्ण वाटा असून, चिकलठाणा कार्यशाळेत रुजू झाल्यानंतर त्यांनी येथेही स्टील बॉडीची बस बांधणीची तयारी सुरू केली.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या अॅल्युमिनियम बांधणीतील बस आहेत. महामंडळाच्या सेवेमुळे ‘एसटीचा प्रवास म्हणजे सुरक्षित प्रवास’ ही भावना प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून महामंडळाने प्रवास अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने स्टील बॉडीच्या परिवर्तन बस (लाल बस) बांधणीचा निर्णय घेतला. एसटी महामंडळाला सेवा देताना खाजगी बसबरोबर स्पर्धा करावी लागत आहे. त्यामुळे स्टील बॉडीतील बसमध्ये देण्यात येणाऱ्या सुविधांमुळे खाजगी बसकडे जाणारा प्रवासी ‘एसटी’क डे आकर्षित होईल,अशी आशा व्यक्त होत आहे. ही बस बांधणीसाठी आवश्यक असलेले यंत्रही कार्यशाळेतच तयार करण्यात येत आहे. लवकरच बांधणीला सुरुवात केली जाणार आहे, असे यू. ए. काटे यांनी सांगितले.