लाईट गुल झाल्याने एसटीची सेवा ठप्प
By Admin | Published: November 16, 2014 12:14 AM2014-11-16T00:14:24+5:302014-11-16T00:38:49+5:30
औरंगाबाद : महावितरणने करार रद्द केल्याने संतापलेल्या जीटीएलने शुक्रवारी विविध भागांतील वीजपुरवठा खंडित करून शहरवासीयांना वेठीस धरले. अनेक भागांतील वीजपुरवठा शनिवारीही खंडितच होता.
औरंगाबाद : महावितरणने करार रद्द केल्याने संतापलेल्या जीटीएलने शुक्रवारी विविध भागांतील वीजपुरवठा खंडित करून शहरवासीयांना वेठीस धरले. अनेक भागांतील वीजपुरवठा शनिवारीही खंडितच होता. त्यातच वीजपुरवठ्याअभावी राज्य परिवहन महामंडळाच्या शहर बससह विविध मार्गांवरील बससेवा विस्कळीत झाल्याने सर्वसामान्य प्रवासी, शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली.
महामंडळातर्फे बसेसमध्ये इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे तिकीट देण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. या इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीनमध्ये प्रवासाचा मार्ग, जमा झालेली रक्कम आदी माहिती संगणकाद्वारे घेतली जाते. विविध मार्गांवर बस रवाना करण्याआधी ही माहिती घेतली जाते.
शुक्रवारी दुपारनंतर सिडको बसस्थानकाचा वीजपुरवठा खंडित झाला. शिवाय शनिवारी सकाळी ८ वाजेनंतर येथील इन्व्हर्टर बंद पडले. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीनमध्ये प्रवासाचा मार्ग टाकणे, जमा झालेली रक्कम याची माहिती घेण्यास, चार्जिंग आदींमध्ये अडचण निर्माण झाली. दुपारपर्यंत सकाळच्या सत्रातील रोकड जमा झालेली नव्हती. प्रवासाचा मार्ग न मिळाल्याने दुपारपर्यंत शहर बसेससह विविध मार्गांवरील बसेस आगारातच उभ्या होत्या.
तिकीट मशीन मिळविण्यासाठी वाहकांना मोठी प्रतीक्षा करावी लागली, अशा परिस्थितीमुळे शहर बसेसचे वेळापत्रकच कोलमडले. यामुळे शाळा सुटण्याच्या वेळेत शहर बसेस न धावल्याने विद्यार्थ्यांची आणि सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय झाली, अशा परिस्थितीत बॅटरींद्वारे कामकाज सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानक येथील वीजपुरवठा खंडित झाल्याने जनरेटरद्वारे येथील कामकाज सुरळीत ठेवण्यात आले होते.
२० शहर बसेस उभ्या
सिडको बसस्थानकाच्या आवारात दुपारी जवळपास २० शहर बसेस उभ्या राहिल्या होत्या. यामध्ये औरंगपुरा, बजाजनगर, रांजणगावसह विविध मार्गांवरील बसेसचा समावेश होता. यामुळे या मार्गांवरील प्रवाशांची गैरसोय झाली.
सेवा देण्याचा प्रयत्न
वीजपुरवठ्याअभावी महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शिवाय, प्रवाशांचीही गैरसोय झाली; परंतु अशा परिस्थितीतही प्रवासी देण्यासाठी प्रयत्न केल्याचे स्थानक प्रमुख आर.बी. राजपूत यांनी सांगितले.