चक्क प्रवाशी बालकाच्या हातात दिली एसटीची स्टेअरिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:02 AM2021-09-15T04:02:07+5:302021-09-15T04:02:07+5:30
गंगापूर (जि. औरंगाबाद) : राज्य परिवहन महामंडळाच्या गंगापूर आगारातील बसच्या (एसटी) चालकाने गाडीतील प्रवासी असलेल्या एका लहान मुलाला आपल्यापुढे ...
गंगापूर (जि. औरंगाबाद) : राज्य परिवहन महामंडळाच्या गंगापूर आगारातील बसच्या (एसटी) चालकाने गाडीतील प्रवासी असलेल्या एका लहान मुलाला आपल्यापुढे बसवून गाडी चालवण्यासाठी हातात स्टेअरिंग दिल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. गंगापूर ते उदगीरला जाणाऱ्या या बस चालकाच्या बेजबाबदारपणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यावर सर्वत्र टीका होत आहे. संबंधित चालकाचा अहवाल गंगापूर आगाराकडून वरिष्ठांकडे सादर करताच संबंधित चालकास निलंबित करण्यात आले असल्याचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले.
वेळेत, खात्रीशीर आणि सर्वात सुरक्षित प्रवास अशी एसटीची ओळख आहे. म्हणूनच प्रवाशांचे नेहमी एसटी प्रवासालाच प्राधान्य असते. राज्य परिवहन महामंडळाचे भविष्य हे चालक-वाहक यांनी प्रवाशांना दिलेल्या सेवेवर अवलंबून आहे. ‘प्रवाशांंच्या सेवेसाठी’ हे ब्रीद वाक्य असले तरी गंगापूर आगारातील चालक आर.बी. शेवाळकर यांनी मात्र कमालच केली. येथून रोज सुटणाऱ्या गंगापूर - उदगीर बस फेरीचे ते १२ सप्टेंबरला चालक होते. बस (एम.एच १३ सी.यू ८११०) उदगीरकडे घेऊन जात असताना त्यांनी बसमधील प्रवाशांच्या जिवाशी खेळत अंबेजोगाईजवळ बसमध्ये प्रवास करणारा व आपला नातेवाईक असलेल्या एका सात वर्षांच्या मुलाला हौशीपोटी स्वतःपुढे बसवून त्याच्याकडे बस चालवण्यासाठी दिली. विशेष म्हणजे यावेळी बसमध्ये ४२ प्रवासी बसलेले होते.
----
व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल
सदरील घटनेचा व्हिडिओ बसमधील एका प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रित करून समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला. धोकादायक बाब म्हणजे यावेळी स्टेअरिंगवर फक्त त्या लहान मुलाचेच हात होते. तर चालकाचे दोन्ही हात बाजूला असल्याचे दिसून येत आहे.
---
गंगापूर आगाराचा चालक आर. बी. शेवाळकर यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ व आगारप्रमुखांकडून आलेल्या अहवालावरून संबंधित चालकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर पुढील कारवाई देखील केली जाईल. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता असा प्रकार कोणत्याही चालकाने करू नये. - अरूण सिया, विभाग नियंत्रक, औरंगाबाद विभाग.
140921\img-20210914-wa0044.jpg
गंगापूर : येथून सुटणारी उदगीर बस चालवतांना लहान मुलगा