दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एक पाऊल पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:11 AM2018-12-13T00:11:09+5:302018-12-13T00:12:02+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी विद्यापीठ प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सेवाभावी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. यासाठी योग्य नियोजन करण्यासाठी डॉ. नरेंद्र काळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी विद्यापीठ प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सेवाभावी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. यासाठी योग्य नियोजन करण्यासाठी डॉ. नरेंद्र काळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक बुधवारी (दि.१२) झाली. या बैठकीत एकूण २२ विषय चर्चेला आले. तर ऐनवेळी ४ विषय घेण्यात आले. यात व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेश करपे यांनी मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडला असल्याकडे सदस्यांचे लक्ष वेधले. अनेक विद्यार्थ्यांना गावाकडून येणारे पैसे बंद झाल्यामुळे शिक्षण सोडून परत जाण्याची वेळ आली आहे. तेव्हा विद्यापीठ प्रशासनाने या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. मागील दुष्काळात विद्यार्थ्यांना मोफत जेवण उपलब्ध करून देण्याचा प्रयोग यशस्वी झाला होता. यावेळीही काही स्वयंसेवी संस्थांची आर्थिक मदत घेऊन दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मदत करता येईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. या भूमिकेला व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी एकमुखी पाठिंबा दिला. तसेच विविध स्वयंसेवी संस्था, उद्योगांकडून आर्थिक मदत मिळविणे, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारे मदत करता येईल, याचे नियोजन करण्यासाठी डॉ. नरेंद्र काळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या समितीमध्ये किशोर शितोळे, डॉ. राजेश करपे, प्रा. सुनील निकम, डॉ. शंकर अंभोरे आणि डॉ. राहुल म्हस्के यांचा समावेश आहे. याशिवाय व्यवस्थापन परिषदेत सिमेंट रस्त्याऐवजी डांबरी रस्ता बनविणे, वाहन भत्त्यात वाढ करणे, असे नियमित विषयांनाही मंजुरी देण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या जमिनीचा घेणार आढावा
विद्यापीठाने विविध संस्थांना शेकडो एकर जमीन लीजवर दिलेली आहे. यातील काही संस्था जमिनीचा वापर योग्य कारणासाठी करीत नाहीत. या संस्थांकडून जमिनीच्या वापराची माहिती घेऊन वापरात असलेली जमीन संस्थांकडे ठेवणे आणि उर्वरित शिल्लक जमीन परत घेण्यासाठीची एका समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी डॉ. फुलचंद सलामपुरे यांची नियुक्ती केली. तर डॉ.राजेश करपे आणि डॉ. शंकर अंभोरे यांची सदस्यपदी नियुक्ती केली.
प्राध्यापकांना मिळणार १५ सीएल रजा
व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ऐनवेळी महाविद्यालयातील संलग्न प्राध्यापकांना ८ किरकोळ रजा (सीएल) मंजूर करण्यात येतात. मात्र राज्यातील इतर विद्यापीठे १५ सीएल देतात. त्यांच्याप्रमाणेच आपल्या विद्यापीठातही १५ सीएल रजा देण्याचा ठराव डॉ. राजेश करपे यांनी मांडला. त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.