औरंगाबादसाठी विमानसेवा वाढविण्याच्या दिशेने पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 06:34 PM2019-05-30T18:34:56+5:302019-05-30T18:37:16+5:30
नागरी उड्डयन मंत्रालयाच्या हालचालींना वेग
औरंगाबाद : औरंगाबादहूनविमानसेवा वाढविण्याच्या दृष्टीने काम सुरू असल्याची माहिती नागरी उड्डयन मंत्रालयाने मंगळवारी टिष्ट्वट करून दिली. त्यामुळे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानसेवा वाढविण्याच्या दृष्टीने पाऊल पडल्याचे दिसत आहे.
नागरी उड्डयन मंत्रालयाने मंगळवारी टष्ट्वीट करून औरंगाबादहून विमानसेवा वाढविण्याच्या दृष्टीने काम सुरू असल्याची माहिती दिली. मागणीचा विचार क रून कंपन्यांकडून विमानसेवा सुरू केली जाईल, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.गेल्या काही वर्षांत औरंगाबादहून सुरू असलेली विमाने बंद पडली. दोन महिन्यांपूर्वी जेट एअरवेजची मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमानसेवा बंद पडली. यापूर्वी औरंगाबादहून सुरू असलेली स्पाईस जेटची विमानसेवा बंद झाली होती. सध्या एअर इंडिया, ट्रूजेट या दोन कंपन्यांकडून विमानसेवा दिली जात आहे. या कंपन्यांमुळे दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद शहराबरोबर विमान हवाई सेवेने जोडलेले आहे. शहराची कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून पाठपुरावा सुरू आहे.
इंडिगो एअरलाईन्स, डेक्कन एव्हिएशनसह झूम एअर या कंपन्यांनी औरंगाबादहून विमान सुरू करण्यास रुची दर्शविली होती. औरंगाबाद-दिल्लीसाठी विमानसेवा सुरू करण्यास झूम एअरने प्रस्तावही डीजीसीएकडे सादर केला होता. कंपनीने त्यांच्या संकेतस्थळावर औरंगाबाद-दिल्ली मार्गाची नोंद करून विमानसेवा सुरू होणार असल्याचे संकेतही दिले होते; परंतु प्रत्यक्षात या विमान कंपन्यांची प्रतीक्षाच आहे.
विमानसेवेच्या अनियमिततेमुळे उद्योग, पर्यटनासह अनेक क्षेत्रांना फटका
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाने सोयीसुविधांत देशभरात भरारी घेतली आहे; परंतु हवाई कनेक्टिव्हिटीत विमानतळ मागेच आहे. ४जेट एअरवेजचे विमान बंद झाल्याने अनेक उद्योग, पर्यटनासह अनेक क्षेत्रांना फटका बसत आहे. त्यामुळे औरंगाबादहून विमानसेवा वाढविण्याची मागणी होते आहे.