नगर जिल्ह्यात नऊ तालुक्यांचे कारभारी महाविकास आघाडीचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 12:52 PM2020-01-08T12:52:06+5:302020-01-08T12:52:16+5:30
जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयावर झेंडा फडकविलेल्या महाविकास आघाडीने नऊ पंचायत समित्या ताब्यात घेत विरोधकांना धोबीपछाड दिला. जिल्ह्यातील १४ पैकी नऊ पंचायत समित्यांमध्ये सभापती व उपसभापती बसविण्यात महाविकास आघाडीला यश आले.
अण्णा नवथर /
अहमदनगर : जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयावर झेंडा फडकविलेल्या महाविकास आघाडीने नऊ पंचायत समित्या ताब्यात घेत विरोधकांना धोबीपछाड दिला. जिल्ह्यातील १४ पैकी नऊ पंचायत समित्यांमध्ये सभापती व उपसभापती बसविण्यात महाविकास आघाडीला यश आले असून, विरोधकांना चार पंचायत समित्यांवर समाधान मानावे लागले. महाविकास आघाडीने तालुक्याच्या राजकारणातही वर्चस्व निर्माण केल्याचे पंचायत समित्यांच्या निवडणुकीतून अधोरेखित झाले आहे.
जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि क्रांतिकारी हे चार पक्ष एकत्र आले. त्यामुळे भाजपाला सपशेल माघार घ्यावी लागली. पंचायत समितींच्या सभापती व उपसभापती पदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीतही चारही पक्षांनी एकीचा नारा देत विरोधकांसमोर आव्हान उभे केले होते. जिल्ह्यातील एकूण १४ पंचायत समितींचे सभापती व उपसभापती पदासाठी निवडणुका घेण्यात आल्या. जामखेड वगळता १३ पंचायत समितींचे सभापती व उपसभापती निवडण्यात आले. राष्ट्रवादीने कोपरगाव, शेवगाव, राहुरी, श्रीगोंदा आणि कर्जत या पंचायत समित्यांमध्ये एक हाती सत्ता मिळविली. संगमनेर पंचायत समितीचे सभापती व उपसभापती काँग्रेसचे झाले. नगर व पारनेर पंचायत समितीवर शिवसेनेचा झेंडा फडकला. नेवासा पंचायत समितीची सत्ता क्रांतिकारी शेतकरी पक्षाने कायम ठेवली.
श्रीगोंदा आणि कर्जत पंचायत समितीत राष्ट्रवादीने भाजपाला धोबीपछाड दिला. राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप हे तालुक्याच्या राजकारणात सक्रि य झाले. त्यांनी या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावत पंचायत समिती ताब्यात घेतली. कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे रोहित पवार व जिल्हाध्यक्ष राजेंद्र फळके यांनी राजकीय खेळी करत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले. पारनेर पंचायत समितीचे सभापती पद सेनेकडे, तर उपसभापती पद राष्ट्रवादीकडे आले. या तालुक्यात शिवसेना व राष्ट्रवादी हे पक्ष प्रथमच एकत्र आले. नगर तालुक्यात काँग्रेस व शिवसेनेने आघाडी करत पंचायत समितीची सत्ता राखली.
अकोले पंचायत समितीत राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला. ही पंचायत समिती भाजपने ताब्यात घेत राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर केले. काँग्रेसमधील विखे गटाने श्रीरामपूर व राहाता पंचायत समितीची सत्ता कायम ठेवली. पाथर्डीच्या भाजपाच्या आमदार मोनिका राजळे यांनी पंचायत समितीची सत्ता राखली.
जिल्हा परिषदेनंतर झालेल्या पंचायत समितीत महाविकास आघाडीने एकत्र येत नऊ पंचायत समित्यांमध्ये सत्ता स्थापन केली आहे. तालुक्याच्या राजकारणातही चारही पक्ष एक झाले असून, यापुढील निवडणुकाही महाविकास आघाडी एकत्रित लढतील, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सांगितले.