लसच उपाय; लसीकरणानंतर एकही मृत्यू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:02 AM2021-04-24T04:02:21+5:302021-04-24T04:02:21+5:30
औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. आतापर्यंत लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना होण्याचे प्रमाण ...
औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. आतापर्यंत लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना होण्याचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे लस हाच एकमेव उपाय असल्याचे समोर येत आहे. लस घेतल्यानंतर एखाद्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला अशीही घटना नाही. सध्या लसची मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. प्रशासनाने आजपर्यंत सर्व व्यापक उपाययोजना केल्या. त्याचा फारसा फरक दिसून आला नाही. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार फेब्रुवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. ३ लाख ७१ हजार १०८ नागरिकांना जिल्ह्यात लस देण्यात आली. लस घेतल्यानंतर काही नागरिकांना कोरोनाची लागण झाली. शहरात पहिला डोस घेतल्यानंतर २२, तर दुसरा डोस घेतल्यानंतर १२ जण पॉझिटिव्ह आले. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिला किंवा दुसरा डोस घेतलेल्या रुग्णांना फारसा त्रास झाला नाही. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा झाली.
पहिल्या डोसनंतर ०.०१३ टक्के पॉझिटिव्ह
पहिला डोस घेतल्यानंतर शहरात २२ जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील आणखी बाधित रुग्णांची माहिती समोर आली नाही. पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्याची धास्ती घेतलेल्यांना आतापर्यंत खूप फायदा झालेला आहे. सामान्य रुग्णांच्या तुलनेत त्यांना फारसा त्रास झाला नाही. विशेष बाब म्हणजे ते आजारातून लवकर बरे झाले.
१,१४, ४९५
आजपर्यंत कोरोनाबाधित रुग्ण.
२,२७५
जणांचा मृत्यू
९७,१९८
कोरोनामुक्त
लस महत्त्वाचीच, मृत्यूचा धोका कमी
कोराेनाचा संसर्ग झाल्यानंतर काही रुग्णांचा एचआरसीटी १८ ते २४ पर्यंत जात आहे. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण झपाट्याने कमी होत असते. लस घेतली असेल तर रुग्ण स्थिर राहतो. शरीरातील वेगवेगळ्या अवयवांना विषाणू बाधा पोहोचवत नाही.
पहिला डोस - ३,३१,१८९
दुसरा डोस - ३९,९१९
एकूण लसीकरण - ३,७१,१०८
डोस घेतल्यानंतरही मला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, पूर्वीच्या तुलनेत त्रास फार कमी होता. औषधोपचाराला चांगला प्रतिसाद मिळतो. लसीकरण मोहीम वेगाने सुरू केल्यानंतर शहरात संसर्ग बऱ्यापैकी आटोक्यात येत आहे.
डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी मनपा.
दोन डोस घेतल्यानंतर फक्त ३४ जण पॉझिटिव्ह
औरंगाबाद जिल्ह्यात ३ लाख ७१ हजार, शहरात जवळपास दोन लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. लस घेतलेल्या नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला, असे एकही उदाहरण आतापर्यंत नाही. त्याचप्रमाणे लस घेतलेले नागरिक अत्यंत कमी प्रमाणात पॉझिटिव्ह येत आहेत.