तूर खरेदी घोटाळ्यातील आरोपी सापडेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 01:06 AM2017-09-05T01:06:48+5:302017-09-05T01:06:48+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ‘नाफेड’च्या केंद्रावरील तूर खरेदी घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल होऊन दोन दिवस उलटूनही एकाही आरोपीला पोलिसांनी अटक केलेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ‘नाफेड’च्या केंद्रावरील तूर खरेदी घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल होऊन दोन दिवस उलटूनही एकाही आरोपीला पोलिसांनी अटक केलेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
या तूर खरेदी घोटाळ्यातील आरोपींची संख्या ७० असून, यात १८ व्यापारी, ४९ शेतकरी व अन्य तिघांचा समावेश आहे. आरोपींमध्ये राजकीय वरदहस्त असलेले काही व्यापारी व पदाधिकाºयांचाही समावेश आहे. यातील काही संशयित खुलेआम शहरातील धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. मात्र, त्यांना पकडण्याचे धाडस चंदनझिरा पोलिसांनी दाखवलेले नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. ७० आरोपींना अटक करणे पोलिसांसाठी आव्हानात्मक असले तरी त्यासाठी कुठलेही आवश्यक नियोजन पोलीस प्रशासनाने केलेले नसल्याचे दिसत आहे. पोलीस यंत्रणा दोन दिवस गणेश विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तात व्यस्त राहणार आहे. मात्र, त्यानंतर या प्रकरणाच्या तपासला गती येण्याची शक्यता आहे.