अजूनही ई-चालान भरलेले नाही? तुमचं वाहन जप्त होणार, 'या' जिल्ह्यात पोलीस मोठी कारवाई करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 14:18 IST2025-01-29T14:17:25+5:302025-01-29T14:18:33+5:30
ई-चालान न भरलेल्या वाहनचालकांवर पोलीस मोठी कारवाई करणार आहेत.

अजूनही ई-चालान भरलेले नाही? तुमचं वाहन जप्त होणार, 'या' जिल्ह्यात पोलीस मोठी कारवाई करणार
वाहतुकीचे नियम प्रत्येक जिल्ह्यात अनेक वाहनचालक पाळत नाहीत, त्यासाठी आता वाहतुक विभागाने प्रत्येक जिल्हातील मुख्य चौकात सीसीटीव्ही बसवले आहेत. एखाद्या वाहनचालकाने नियम मोडल्यास त्या वाहनचालकास ऑनलाईन चलन मिळते. पण, या चलनावर अनेक वाहनचालकांनी दंड भरलेला नाही. यामुळे आता वाहतुक विभाग अॅक्शनमोडवर आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चलन न भरलेल्या वाहनचालकांवर मोठा कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत पोलीस एसीपी वाहतूक सहायक पोलीस आयुक्त धनंजय पाटील यांनी माहिती दिली.
एकीकडे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, नागरिकांकडून सर्रास वाहतुकीचे नियम मोडले जातात. वारंवार जनजागृती करूनही नियमांची पायमल्ली केली जाते. त्यात ई-चालनद्वारे दंड येत असल्याने आता पोलिसांची पूर्वी असलेली भीतीदेखील लुप्त होत चालली आहे. गतवर्षी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे अशा १ लाख ९८ हजार ५८९ वाहनचालकांना कैद करून १९ कोटी ४२ लाख ८६ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.
गेल्या दहा वर्षांमध्ये शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली. क्रमाने अरुंद रस्ते, अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे वाहतुकीचा खोळंबा होण्याचे प्रमाणही वाढले. महापालिका, पोलीस प्रशासन सुरळीत वाहतुकीसाठी सातत्याने अपयशी ठरत असताना, वाहनचालकांचा बेशिस्तपणाही वारंवार उघडकीस येतो. नियम मोडणाऱ्यास ई-चालनद्वारे थेट छायाचित्रांसह दंडाची पावती जाते.
वाहनांवर जप्तीची कारवाई होणार
दंड ठोठावलेल्या १ लाख ८७ हजार ५०८ वाहनचालकांकडे अद्यापही १८ कोटी ३६ लाख ६२ हजार २५० रुपयांचा दंड भरणे बाकी आहे.उलट दिशेने जाणे, सुसाट वाहने पळवणे, हातात मोबाइल धरून वाहन चालवणे, ट्रिपल सीट, फॅन्सी नंबर प्लेट व अनेक प्रकारे वाहतुकीचे सर्रास नियम मोडले जातात. पण वाहतूक दंड प्रलंबित ठेवणाऱ्यांना रितसर नोटीस पाठवली जात आहे, तरीही त्याकडे दुर्लक्ष होत असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. लवकरच दंड वसुलीसाठी मोहीम राबवून कारवाई केली जाईल. दंड न भरणाऱ्या वाहनावर जप्तीची कारवाई सुद्धा होईल, अशी माहिती वाहतूक पोलिस धनंजय पाटील यांनी दिली.