तरीही मुंबईसाठी रेल्वे आरक्षण वेटिंगवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:04 AM2021-03-25T04:04:22+5:302021-03-25T04:04:22+5:30
औरंगाबाद : कोरोनाचा औरंगाबाद शहरात दुसऱ्यांदा कहर सुरू झाला असला तरी, मुंबईला ये-जा करणाऱ्या प्रवाशांची गर्दी काही कमी होताना ...
औरंगाबाद : कोरोनाचा औरंगाबाद शहरात दुसऱ्यांदा कहर सुरू झाला असला तरी, मुंबईला ये-जा करणाऱ्या प्रवाशांची गर्दी काही कमी होताना दिसत नाही. प्रवासासाठी फक्त ऑनलाइन आरक्षण प्रक्रिया सुरू असल्याने अनेकांना वेटिंगवर राहावे लागत आहे.
औरंगाबाद रेल्वेस्थानकावरून दररोज १७ रेल्वे येत-जात असून, आठवड्यातून दोन विशेष गाड्याही धावतात. मुंबईकडे जाणाऱ्या सर्वच गाड्यांतून गर्दी असते. त्यामुळे मुंबईसाठी प्रवाशांची वेटिंग लिस्ट वाढतच आहे. हैदराबादकडे जाणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी असून, त्यासाठी मात्र प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागत नाही. येथून इतर राज्यात जाणारे प्रवासीही आहेत. रेल्वे स्टेशनवर गर्दी होत असून, त्यात वाढत्या कोरोनाची चिंता कुणालाही दिसत नाही.
परीक्षा अद्याप संपलेल्या नाही...
दरवर्षी विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या की प्रवाशांची गर्दी वाढत असते. परंतु कोविडमुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा अद्याप झालेल्या नाही. अन्यथा ही गर्दी पुन्हा वाढली असती. स्थानकावर खबरदारी घेतली जात असली तरी प्रवाशांना ऑनलाइन टिकीट काढूनच प्रवासाला निघावे लागते. एप्रिल महिन्यात परीक्षा संपल्यावर गर्दी अधिक वाढण्याची शक्यता आहे.
स्थानकावर विशेष खबरदारी
औरंगाबादेतून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने स्थानकावर त्यांचीच गर्दी दिसते. ऑनलाइन टिकीट घेऊन आणि मोबाइलमध्ये ऑनलाइन टिकीट दाखवून प्रवाशी रेल्वेस्थानकात प्रवेश करताना दिसत आहेत. येथेही प्रवाशांना अंतर राखूनच स्थानकात प्रवेश दिला जात आहे.
लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तविली जात असल्यामुळे कामगार आपल्या गावाकडे जाण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत.
प्रवाशांना सेवा देण्याकडे लक्ष्य...
कोविडची संख्या वाढत असली तरी ती जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. आम्ही प्रवाशांना सेवासुविधा देण्यावर लक्ष्य ठेवून आहोत. येणाऱ्या प्रवाशांना काही अडचणी असल्यास त्यांना मदत केली जाते. प्लॅट फाॅर्मवरील गर्दी टाळण्यासाठी प्लॅट फाॅर्म तिकीट सुरू केले असल्याने अनेकदा फक्त प्रवासीच स्थानकात जात आहेत.
- रेल्वे अधिकारी, औरंगाबाद
कॅप्शन...
औरंगाबाद रेल्वेस्थानकावर प्रवाशांची अशी गर्दी दिसत आहे.