पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडे आढळली उत्तेजक औषधी द्रव्य
By बापू सोळुंके | Published: June 30, 2024 05:18 PM2024-06-30T17:18:44+5:302024-06-30T17:19:27+5:30
खेळाडूनंतर आता पोलीस भरतीच्या उमेदवारांकडे उत्तेजक द्रव्य
छत्रपती संभाजीनगर: सातारा येथील भारत राखीव बटालियनच्या पोलीस भरतीसाठी आलेल्या एका उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्य आणि गोळ्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. २९ जून रोजी सकाळी मैदानी चाचणीपूर्वी तपासणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. उत्तेजक द्रव्य आणि औषधीं गोळ्यासह त्याला सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
धम्मानंद प्रकाश इंगळे (२४,रा. बोरगाव वसू, ता.चिखली,जि. बुलडाणा)असे उमेदवाराचे नाव आहे. याविषयी प्राप्त माहिती अशी की, सातारा परिसरातील भारत राज्य राखीव बटालियन येथील रिक्त पोलीस शिपायांच्या रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. मैदानी आणि शारिरीक चाचणीसाठी अर्जदार उमेदवारांना बोलावण्यात आले आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील उमेदवार धम्मानंद इंगळे याच्यासह अन्य उमेदवारांची काल २९ जून रोजी मैदानी आणि शारिरीक चाचणी होती. या उमेदवारांना मैदानावर सोडण्यापूर्वी त्यांची तपासणी करण्यात येते. यानुसार पोलीस नाईक अन्सार इब्राहिम शेख हे अन्य पोलिसांसह प्रत्येक उमेदवारांची तपासणी करून त्यांना मैदानावर सोडत होते. यावेळी धम्मानंद याच्या बॅगेमध्ये डीओएक्सटी-एसएल ही एक टॅबलेट, टेझोविन कंपनीची ३०एमजीची तीन टॅबलेट, डेक्सोना कंपनीच्या २एमएलचे इंजेक्शनच्या चार बॉटल्स आढळून आले.
ही औषधी गोळ्या व इंजेक्शन उत्तेजक म्हणून गणले जातात. ही बाब पोलीस नाईक शेख आणि तेथील अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला औषधीसह ताब्यात घेतले. पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी पूर्वी तो ही औषधी गोळ्या सेवन करून इंजेक्शन टोचून घेण्यासाठी त्याने स्वत:जवळ ठेवल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. याप्रकरणी नाईक शेख यांनी सातारा पोलीस ठाण्यात धम्मानंदविरोधात तक्रार नोंदवली. पोलीस हवालदार गोर्डे या घटनेचा तपास करीत आहेत.
खेळाडूनंतर आता पोलीस भरतीच्या उमेदवारांकडे उत्तेजक द्रव्य
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळांच्या स्पर्धांमध्ये उत्तेजक द्रव्य सेवन करणाऱ्या खेळाडूूंवर बंदी घातले जाते. उत्तेजक द्रव्याचा परिणाम त्याच्या खेळावर होत असतो. यामुळे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची डोपींग चाचणी केली जाते. आता पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडे उत्तेजक औषधी आणि इंजेक्शन आढळून आल्याने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये खळबळ उडाली आहे.