१०८ च्या सुविधेला नियमांचा गतिरोधक
By Admin | Published: July 25, 2016 12:09 AM2016-07-25T00:09:28+5:302016-07-25T00:42:59+5:30
व्यंकटेश वैष्णव , बीड जिल्ह्यात १०८ या टोलफ्री क्रमांकाच्या आरोग्य वाहिकेत प्रथमोपचाराची सोय आहे. मात्र बीएचएमएस डॉक्टरांची कमतरता असल्याने ही सुविधा पूर्णत: कोलमडली आहे.
व्यंकटेश वैष्णव , बीड
जिल्ह्यात १०८ या टोलफ्री क्रमांकाच्या आरोग्य वाहिकेत प्रथमोपचाराची सोय आहे. मात्र बीएचएमएस डॉक्टरांची कमतरता असल्याने ही सुविधा पूर्णत: कोलमडली आहे. बीड तालुक्यातील नेकनूर येथे दोन दिवसापूर्वी एका साप चावलेल्या मुलीला १०८ ची रुग्ण वाहिका असताना देखील नातेवाईकांना खाजगी वाहनाने बीड जिल्हा रुग्णालयात हालवावे लागले होते.
राज्य आरोग्य विभागाकडून अपत्कालीन सेवा म्हणून १०८ या टोलफ्री क्रमांकावरून जिल्हा भरातील ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी डॉक्टरांसमवेत प्राथमिक उपचाराची व्यवस्था असलेली रुग्णवाहिका सेवा देण्याचा शासनाचा उद्देश आहे. मात्र या उद्देशाला बीड जिल्ह्यात हरताळ फासला जात असल्याचे समोर येत आहे. या रुग्णवाहिका वाहतूकीचा एका खाजगी ठेकेदाराला ठेका दिलेला आहे.
जिल्ह्यात एकूण १९ रुग्ण वाहिका अपत्कालीन आरोग्य सेवेसाठी तैनात आहेत. या वाहनांवर ड्राईव्हर आहेत. मात्र डॉक्टरांची कमतरता आहे. ही कमतरता ग्रामीण भागातील रुग्णांच्या रुग्णांच्या जिवावर बेतू शकते.
बीड तालुक्यातील नेकनूर येथील कुटीर व स्त्री रुग्णालयात १९ जुलै रोजी वैशाली विठ्ठल ठोंबरे या मुलीला साप चावला होता. नेकनूर येथील स्त्री रुग्णालयातून बीड जिल्हा रुग्णालयात रेफर केले. नेकनूर येथे १०८ सुविधाची रुग्णवाहिका होती. मात्र केवळ वाहिकेतील डॉक्टर नसल्यामुळे संबंधीत रुग्णवाहिकेच्या ड्राईव्हरने रुग्णवाहिका देण्यास नकार दिला.
शेवटी रुग्ण नातेवाईकांनी खाजगी वाहनातून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. असेच प्रकार बीड जिल्ह्यातील उमापूर, माजलगाव, धारूर, परळी, आष्टी या तालुक्यांमध्ये होत आहेत. ही वस्तूस्थिती आहे.
४बीड जिल्हयात एकूण १९ आपतकालीन सेवा देणाऱ्या रुग्णवाहिका आहेत. यासाठी ५५ डॉक्टर कार्यरत आहेत. मात्र रुग्णांची संख्या लक्षात घेता डॉक्टरांची संख्या वाढविण्याची गरज आहे. एकाच डॉक्टरांना अनेकवेळा दोन शिपमध्ये काम करावे लागते. मनुष्यबळ वाढविले तर या योजनेचा उद्देश सफल होऊ शकतो अन्यथा ग्रामीण भागातील गरजू व गोरगरीब रुग्णांच्या जिवावर देखील बेतू शकते.
आम्ही डॉक्टरांची नियुक्ती केलेली आहे. जर कुठे रुग्णवाहिकेची सेवा अपुरी पडत असेल तर मी स्वत: याकडे काळजीपूर्वक लक्ष देईल. रुग्णांना चांगली सेवा मिळावी यासाठी आमची मोठी टीम या योजने अंतर्गत काम करत आहे. त्रुटी दूर करुन चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहू.
- अविनाश राठोड, समन्वयक, मेडीकल इमर्जन्सी सर्व्हिस, बीड