ट्रॅक्टरमध्ये कडब्याखाली लपवून आणला दारूसाठा; देशीदारूचे १८ बॉक्स गुन्हे शाखेने केले जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 06:59 PM2021-04-07T18:59:24+5:302021-04-07T19:00:32+5:30
The liquor was hidden in a tractor पोलिसांनी त्याला दुचाकीसह ताब्यात घेतले. त्यानंतर काही अंतरावरील ट्रॅक्टर रोखले.
औरंगाबाद: ट्रॅक्टरमध्ये कडब्याखाली लपवून आणलेले देशीदारूचे १८ बॉक्स गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने पकडले तर पुंडलिकनगर पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान देशी विदेशी दारू साठ्याची चोरटी वाहतूक करणारी कार पकडली. या वेगवेगळ्या कारवाईत सुमारे लाखाचा दारू साठा आणि दोन वाहने पोलिसांनी जप्त केली.
मुकुंदनगर येथील रहिवासी महिला चोरट्या मार्गाने दारूसाठा शहरात आणून विक्री करते, अशी माहिती खबऱ्याने गुन्हे शाखेला दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, हवालदार संतोष सोनवणे, रितेश जाधव, विशाल पाटील, आनंद वाहुळ यांचे पथकाने खबऱ्याला कामाला लावले. मंगळवारी रात्री जालना जिल्ह्यातून ट्रॅक्टरमध्ये कडब्याखाली लपवून दारूसाठा शहरात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दारू जप्त करण्यासाठी बायपासवर सापळा रचला तेव्हा संशयित ट्रॅक्टर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास झाल्टा फाटा ते जुना बीड बायपास रस्त्याने चिकलठाणकडे येत असल्याचे पोलिसांना दिसले. त्यांच्यामागून एक दुचाकीस्वार पोलिसांना दिसला.
या दुचाकीस्वाराला ताब्यात घेऊन त्याची पोलिसांनी चौकशी केली असताना त्याने त्याचे नाव जगन्नाथ एकनाथ जोशी असे सांगितले. कडबा घेऊन शहरात जात असल्याचे तो पोलिसांना म्हणाला.पोलिसांनी त्याला दुचाकीसह ताब्यात घेतले. त्यानंतर काही अंतरावरील ट्रॅक्टर रोखले. ट्रॅक्टरमध्ये चाऱ्याखाली देशी दारूचे तब्बल १८ बॉक्स आढळून आले. ट्रॅक्टर चालक गणपत धोंडिराम नजन (रा. दरेगांव.,ता. जालना) याच्याकडे याविषयी चौकशी केली असता आरोपी जोशी याने त्यांना चार हजार रुपयांमध्ये हा दारूसाठा औरंगाबादला घेऊन जाण्यासाठी दिल्याचे सांगितले. आरोपी जोशी याच्याकडे सखोल चौकशी केली असता मुकुंदनगर येथील सुमनबाई पिराजी गायकवाड या महिलेचा हा दारूसाठा असल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी हा दारूसाठा, ट्रॅक्टर, दुचाकी जप्त केली आणि जोशी,नजन यांना अटक केली. सुमनबाईचा शोध सुरू केला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविला.