चोरीस गेलेली सायकल पुन्हा मिळाली; तिसरीतील मुलाने पोलिसांना लिहिले भावनिक पत्र...

By राम शिनगारे | Published: January 29, 2024 01:58 PM2024-01-29T13:58:00+5:302024-01-29T13:59:31+5:30

मामांनी वाढदिवसाला गिफ्ट दिली होती सायकल; पोलिसांनी विद्यार्थ्याचे ठाण्यात बोलावून केले कौतुक

Stolen bicycle recovered; class Third boy wrote an emotional letter to the police... | चोरीस गेलेली सायकल पुन्हा मिळाली; तिसरीतील मुलाने पोलिसांना लिहिले भावनिक पत्र...

चोरीस गेलेली सायकल पुन्हा मिळाली; तिसरीतील मुलाने पोलिसांना लिहिले भावनिक पत्र...

छत्रपती संभाजीनगर : मामांनी आठव्या वाढदिवसाला भेट दिलेली सायकल चार महिन्यांपूर्वी चोरीला गेली. ही सायकल जवाहरनगर पोलिसांनी शोधून काढत तिसरीतील विद्यार्थ्याकडे सुपूर्द केली. पोलिसांनी सायकल शोधून काढल्यामुळे आनंद झालेला तिसरीतील विद्यार्थी वैकुलराज देशमुख याने पोलिसांचे कौतुक करणारे पत्रच स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिले. जवाहरनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांना पत्र प्राप्त होताच त्यांनी विद्यार्थ्यास ठाण्यात बोलावून घेत त्याचे कौतुक केले.

जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, सहायक निरीक्षक दिलीप चंदन, उपनिरीक्षक रमेश राठोड हे एका सायकल चोरीच्या गुन्ह्यात तपास करीत असताना वाळूज एमआयडीसी परिसरात तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्या मुलांकडे चोरीच्या तब्बल ८० सायकली सापडल्या. या सायकलींचे जवाहरनगर पोलिसांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मूळ मालकांचा शोध घेऊन त्यांच्याकडे सुपूर्द केल्या. त्यात वुडरिच हायस्कूलमधील तिसरीतील विद्यार्थी वैकुलराज पुरुषोत्तम देशमुख याची मामाने आठव्या वाढदिवसाला भेट दिलेली सायकल सापडली. ही सायकल मिळाल्यानंतर आनंदात हरखून गेलेल्या वैकुलराजने पाेलिस निरीक्षक केंद्रे यांना पत्र लिहिले. पत्रात तो म्हणतो, माझी सायकल चोरीला गेली होती. ती पोलिसांनी शोधून दिली. ती सायकल ऑगस्ट २०२३ मध्ये आणली होती. सप्टेंबरमध्येच चोरीला गेली. सायकल चोरीला गेल्यापासून चार महिने झाले. मला आता समजले की गुन्हा लपत नसतो. म्हणून गुन्हा करायचा नसतो. सर्व पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून व कर्तव्यदक्षतेतून समाज व राष्ट्र सुरक्षित राहते. याचा मला प्रत्यय आला. माझ्या मामांनी आठव्या वाढदिवसाला सायकल भेट दिली होती. ती चोरीला गेल्यानंतर पोलिसांनी शोधून दिल्याबद्दल मी जवाहरनगर स्टेशनचे प्रमुख केंद्रे, चंदन व सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानतो.

विद्यार्थ्याचे ठाण्यात बोलावून कौतुक
निरीक्षक केंद्रे यांना पत्र मिळताच त्यांनी त्यावरील नंबरवर फोन करून वैकुलराज यास पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. चॉकलेट देऊन कौतुक केले. यावेळी विद्यार्थ्याचे वडील डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Stolen bicycle recovered; class Third boy wrote an emotional letter to the police...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.