‘पेट’ परीक्षा पुन्हा लांबणार
By Admin | Published: June 28, 2017 12:47 AM2017-06-28T00:47:05+5:302017-06-28T00:51:12+5:30
औरंगाबाद : मागील दोन वर्षांपासून रखडलेली पीएच. डी. प्रवेश परीक्षा (पेट-४) घोषित करण्यात आल्यानुसार २ जुलै रोजी घेण्यात येणार नाही, यावर शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मागील दोन वर्षांपासून रखडलेली पीएच. डी. प्रवेश परीक्षा (पेट-४) घोषित करण्यात आल्यानुसार २ जुलै रोजी घेण्यात येणार नाही, यावर शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. परीक्षेची नवीन तारीख घोषित करण्यासाठी मंगळवारी सर्व अधिष्ठातांची बैठक बोलावण्यात आली होती; मात्र त्यात मुहूर्त निघाला नसल्याचे समजते. यासाठी उद्या, बुधवारी सकाळी १० वाजता पुन्हा बैठक होणार आहे.
विद्यापीठाने २८ जुलै २०१६ रोजी ‘पेट-४’साठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले होते, तेव्हापासून आतापर्यंत पेट परीक्षा झालेलीच नाही. मागील महिनाभरापूर्वी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी पेट परीक्षा २ जुलै रोजी होणार असल्याची घोषणा केली होती; मात्र ही घोषणाही हवेतच विरणार असल्याचे स्पष्ट झाले. पेट परीक्षा आॅनलाईन घेण्याचा निर्णय तत्कालीन बीसीयूडी संचालक डॉ. सतीश पाटील यांनी घेतला. यासाठी वुई शाईन या कंपनीला लाखो रुपयांचे कंत्राटही देण्यात आले; मात्र या कंपनीमुळे परीक्षेला उशीर होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कुलगुरूंनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेल्या तारखेला परीक्षा न होण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढावली आहे. आता ही परीक्षा केव्हा घ्यायची, यासाठी मंगळवारी सायंकाळीच अधिष्ठातांची बैठक बोलावण्यात आली होती; मात्र यात कोणताही निर्णय झाला नाही, त्यामुळे बुधवारी सकाळी पुन्हा एकदा ही बैठक होणार आहे. या बैठकीत नवीन तारीख ठरण्याची शक्यता आहे. याविषयी पेट-४ ची जबाबदारी असलेले प्रभारी अधिकारी डॉ. सतीश पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
व्यवस्थापन परिषदेची बैठक स्थगित
व्यवस्थापन परिषदेची मंगळवारी होणारी बैठक दुपारनंतर सुरू झाल्यामुळे सर्व विषय पूर्ण झाले नाहीत. रात्री ८ वाजेपर्यंत ही बैठक चालल्यानंतर स्थगित करण्यात आली आहे. उद्या, बुधवारी सकाळी ११ वाजता पुन्हा व्यवस्थापन परिषदेची बैठक होणार आहे. यात साई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संलग्नीकरण रद्द करण्याच्या निर्णयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेअंती साईचे प्रथम वर्षाचे संलग्नीकरण रद्द करण्यात आले असल्याचे समजते; अधिकृत माहिती बैठक संपल्यानंतरच देण्यात येईल.