पथकावर दगडफेक

By Admin | Published: September 8, 2015 12:34 AM2015-09-08T00:34:36+5:302015-09-08T00:44:41+5:30

औरंगाबाद : शिवाजीनगर - रामनगर रस्त्यात येणारी घरे पाडण्यासाठी महानगरपालिकेचे पथक सोमवारी मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनजवळ पोहोचले.

Stone bangle | पथकावर दगडफेक

पथकावर दगडफेक

googlenewsNext


औरंगाबाद : शिवाजीनगर - रामनगर रस्त्यात येणारी घरे पाडण्यासाठी महानगरपालिकेचे पथक सोमवारी मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनजवळ पोहोचले. मात्र, संतप्त नागरिकांनी पाडापाडीच्या कारवाईला तीव्र विरोध करून जेसीबीवर दगडफेक केली. त्यामुळे मनपाला ही कारवाई थांबवावी लागली. यानंतरही स्थानिक नागरिकांनी दिवसभर येथे ठिय्या आंदोलन केले. आधी पर्यायी जागा आणि नंतरच कारवाई करा, अशी मागणी या नागरिकांनी केली.
मनपाने चार दिवसांपूर्वीच मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन ते शिवाजी चौक हा रस्ता मोकळा केला. याठिकाणी दीडशेहून अधिक इमारती भुईसपाट करण्यात आल्या. त्याची धूळ खाली बसवण्यापूर्वी मनपा प्रशासन येथूनच जाणारा शिवाजीनगर-रामनगर हा आणखी एक रस्ता मोकळा करण्यासाठी सरसावले आहे. त्यासाठी शुक्रवारी जयभवानीनगर आणि विश्रांतीनगरात काही ठिकाणी मार्किंग करण्यात आली. शनिवारी मात्र, राहिलेल्या भागात मार्किंग करण्यास नागरिकांनी विरोध केला होता. त्यानंतर आज मनपाचे पथक याठिकाणी पाडापाडीच्या कारवाईसाठी पोहोचले. कारवाईला सुरुवात करताच स्थानिक रहिवाशांनी त्याला जोरदार विरोध केला.
दगडफेकीनंतर मनपाने पाडापाडीची कारवाई थांबविली, पण त्यानंतरही राहिलेल्या भागात मार्किंगचे काम मात्र सुरूच होते.
४मनपाच्या पथकाने राहिलेल्या भागात मार्किंग पूर्ण केले. या पथकात नगररचना विभागातील उपअभियंता ए. बी. देशमुख, नितीन गायकवाड, काही इमारत निरीक्षक आणि इतरांचा समावेश होता.
मार्किंगला आमचा विरोध नाही; परंतु मनपाने आधी एकत्रित पंचनामे करावेत आणि आम्हाला पर्यायी जागा द्यावी, अशी आमची मागणी आहे. त्याशिवाय आम्ही बुलडोझर चालवू देणार नाही, असे आंदोलनकर्त्यांच्या वतीने भाकपचे शहर सचिव मधुकर खिल्लारे यांनी सांगितले.
नागरिकांनी शनिवारी जिल्हाधिकारी निधी पांडे यांना भेटून ही कारवाई थांबविण्याची मागणी केली होती. पांडे यांनी सोमवारी अप्पर जिल्हाधिकारी सोरमारे हे पाहणी करतील, असे आश्वासन दिले. त्यानुसार आज हे नागरिक मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनसमोरील चौकात सोरमारे यांची वाट बघत थांबले होते. परंतु दुपार झाली तरी जिल्हा प्रशासनाचे कुणीच प्रतिनिधी तिकडे फिरकले नाहीत. उलट मनपाचे पथक पाडापाडीसाठी धडकले. त्यामुळे नागरिक अधिकच संतापले.

Web Title: Stone bangle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.