'भावाच्या डोक्यात झोपेतच घातला दगड'; अनैतिक संबंधातून चुलतभाऊ आणि पत्नीने खून करून प्रेत शेतात पुरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 05:51 PM2021-04-16T17:51:37+5:302021-04-16T18:00:02+5:30
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मृतदेह सापडल्यानंतर अवघ्या २४ तासात मृतदेहाची ओळख पटवून आरोपींना गजाआड केले.
पैठण : बालानगर येथील शेतात कुजलेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह हा गावातील रघुनाथ घोंगडे ( रा. बालानगर ) यांचा असल्याचे तपासात समोर आले आहे. अनैतिक संबंधात अडथळा येत असल्याने रघुनाथ घोंगडेची पत्नी व चुलत भावानेच हा खुन केल्याचे उघड झाले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मृतदेह सापडल्यानंतर अवघ्या २४ तासात मृतदेहाची ओळख पटवून आरोपींना गजाआड केले.
गुरूवारी बालानगर येथील गट क्रमांक १७ मधील शेताची नांगरणी सुरू होती. दरम्यान, शेतकऱ्यांने वावराच्या मध्यभागी असलेला काट्याचा ढीग बाजूला केला असता तेथे जमीनीत पुरलेला कुजलेल्या अवस्थेतील मानवी मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांनी पंचनामा करून पोलीस ठाण्यात नोंद घेतली होती. प्रकरणाचा तपासाची सुत्रे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांना देण्यात आली होती. दरम्यान, पोलीस तपासात दत्तात्रय उर्फ शिवाजी जग्गनाथ घोंगडे व यशोदा रघुनाथ घोंगडे ( दोघे रा . बालानगर ) यांनी मिळून यशोदाचा पती रघुनाथ घोंगडे याचा जानेवारी महिन्यात खुन केला असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली.
यानंतर संशयित दत्तात्रय उर्फ शिवाजी जग्गनाथ घोंगडे (४०) रा.गट नं १७ (शेतवस्ती बालानगर) यास पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत शिवाजी याने चुलत भाऊ रघुनाथ घोंगडेची पत्नी यशोदासोबत अनैतिक संबंध असल्याचे सांगितले. त्यांच्या संबंधांबद्दल रघुनाथ यास समजले होते. त्यावरुन तो यशोदाला व तिच्या मुलांना नेहमी मारहाण करत असे. संबंधात अडथला येत असल्याने दोघांनी रघुनाथला संपविण्याचे ठरवले. दरम्यान, मकर संक्रातीच्या ८ दिवसांच्या आधी रघुनाथने यशोदाला मारहाण केली. त्याचदिवशी मी त्याला माझ्या शेतातील झोपण्यासाठी घेऊन गेलो. रघुनाथ झोपलेला असताना शिवाजीने घरी जाऊन यशोदाला शेतात आणले. झापेत असलेल्या रघुनाथच्या डोक्यात दगड घालून आणि काठीने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर राधाबाई भाऊसाहेब घोंगडे यांच्या शेतात मृतदेह पुरुन टाकला, अशी कबुली दिली. पोलिसांनी रघुनाथची पत्नी यशोदा (२६) हिला ताब्यात घेऊन चौकश केली. तिने देखील शिवाजीने सांगितलेला घटनाक्रम सांगून खून केल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपींना एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, सहा. पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे , पोलीस उपनिरिक्षक संदीप सोळंके , पोहेकॉ प्रमोद खांडेभराड , किरण गोरे , पोना नरेंद्र , संजय भोसले , पोकॉ संजय तांदळे महिला पोलीस पद्मा देवरे यांनी केली. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास उत्कृष्ट कामगिरीसाठी १० हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.