भांडण सोडविणार्या पोलिसाच्या डोक्यात घातला दगड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 06:01 PM2018-03-17T18:01:01+5:302018-03-17T18:02:13+5:30
रस्त्यात आपसात हाणामारी करणार्या दोन भावंडांना आवरण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या डोक्यात दगड घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
औरंगाबाद: रस्त्यात आपसात हाणामारी करणार्या दोन भावंडांना आवरण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या डोक्यात दगड घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पोलिसाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना शुक्रवारी रात्री सात वाजेच्या सुमारास आंबेडकरनगर येथे घडली.
पर्या उर्फ प्रवीण साबळे आणि आकाश साबळे अशी आरोपींची नावे आहेत. अजीम परसवाल असे जखमी पोलीस काँन्स्टेबलचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना सिडको पोलिसांनी सांगितले की, पोलीस काँन्स्टेबल अजीम आणि पोलीस काँन्स्टेबल सिरसाट हे शुक्रवारी रात्री पावणे सात वाजेच्या सुमारास गस्तीवर असताना जळगाव रोडवरील आंबेडकरनगरजवळ अपघात झाला असून तेथे नागरीक जमा झाले असून तातडीने तेथे रवाना होण्याची सूचना शहर पोलीस नियंत्रण कक्षातील अधिकार्यांनी त्यांना दिली. यामुळे पो.काँ. अजीम आणि सिरसाट हे तेथे दाखल झाले. तेथे गेल्यानंतर अपघात किरकोळ स्वरुपाचा असल्याने संबंधित वाहनचालक तेथून स्वत: रुग्णालयात गेल्याचे त्यांना समजले. त्या घटनास्थळापासून अवघ्या काही १५ ते २० मिटर अंतरावर रस्त्यामध्ये दोन तरुण आपसात हाणामारी करीत असल्याचे पोलिसांना दिसले.
यावेळी अजीम हे लगेच त्यांचे भांडण सोडविण्यासाठी धावले. यावेळी दोन्ही भावंडांनी आमचे भांडण का सोडवितो,असे विचारत त्यांच्या चेहर्यावर दगड मारला. या घटनेत अजीम यांचा कपाळमोक्ष झाला आणि ते रक्तबंबाळ झाले. दगड लागल्यानंतरही अजीम आणि सिरसाट यांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला,मात्र ते तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेनंतर सिरसाट यांनी अजीम यांना तातडीने जळगाव रोडवरील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. याप्रकरणी आरोपींविरोधात सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.पोलीस उपनिरीक्षक एस.बी. कोते हे तपास करीत आहे.