औरंगाबाद शहरात जमावबंदी लागू, दगडफेकीत 3 पोलीस जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2018 11:24 AM2018-01-02T11:24:29+5:302018-01-02T12:27:30+5:30
भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ सिद्धार्थ नगर परिसरात दगडफेक झाली.
औरंगाबाद - भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ सिद्धार्थ नगर परिसरात दगडफेक झाली. गोदावरी शाळा, सिद्धार्थ नगर, टीव्ही सेंटर येथे मंगळवारी सकाळी जमावकडून दोन वाहने पेटवण्यात आली व रस्त्याने जाणाऱ्या लोकांना मारहाणदेखील करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबारही केला. दरम्यान, दगडफेकीत तीन पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर औरंगाबाद शहरात जमावबंदी लागू करण्यात आली.
शहरात बाजारपेठ शैक्षणिक संस्था बंद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मंगळवारी होणाऱ्या सर्व परीक्षा, प्रात्याक्षिक रद्द केले आहे. पोलीस आयुक्तांनी कुलसचिवांशी चर्चा करून रद्द करण्याची विनंती केली होती. यावर परीक्षा विभागाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच प्रशासकीय कामकाज ही बंद करण्यात आल आहे. शहरातील अनेक महाविद्यालये, शाळा, बहुतेक बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
एसटी'चा चक्का जाम, प्रवाशांचे हाल
आमखास मैदान येथे सकाळी एक बस फोडीच्या घटनेनंतर सकाळी ७ वाजेपासून मध्यवर्ती बसस्थानकात वाहतूक थांबविण्यात आली. पोलिसांच्या मदतीने बस सेवा सुरळीत केली जात आहे,परंतु बसस्थानकात बसच्या रांगा लागल्या असून प्रवाशांचे हाल होत आहेत. सकाळपासून बसथनकात वाहतूक व्यवस्था ठप्प झाली असून यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. एसटीत आणि बसस्थानकात प्रवाशांना बसची वाट पाहत ताटकळत बसावे लागत आहे. स्थानकावरून जाणाऱ्या बहुतेक बस बंद करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेचे पडसाद मराठवाड्यातही उमटले. नगर-पुणे रस्त्यावर राज्य राखीव दलाच्या ६ कंपन्या तैनात केल्या आहेत. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेक व जाळपोळीत झाले.
मोठा अनर्थ टळला
विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येणार असल्याने पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक पोलिसांनी वळविली होती. पुण्याकडे येणारी वाहतूक न्हावरा फाटामार्गे सोलापूर रस्त्याकडे, शिक्रापूरमार्गे चाकणकडे, कोरेगाव भीमा येथून चौफुल्याकडे वळविण्यात आली. पुण्याकडून येणारी वाहतूक खराडीमार्गे सोलापूर रोडने न्हावरामार्गे नगरकडे, विश्रांतवाडीमार्गे चाकणकडे वळविली होती. तरीही पुणे नगर रस्त्यावर कोंडी झाली.