शाळेचा मनमानी कारभार बंद करा; शुल्क वसुलीविरोधात पालकांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 08:23 PM2021-02-02T20:23:26+5:302021-02-02T20:24:45+5:30
आम्ही फीस भरण्यास तयार आहोत, शाळेने जेवढी सुविधा दिली जेवढे शिकविले तेवढीच फीस घ्यावी
औरंगाबाद : ‘बहुतांश पालकांच्या उत्पन्नाचे स्रोत बंद आहेत. ८ महिने कामधंदा नसल्याने माणसं घरात बसून होती. घर चालविणे अवघड झाले. काय खायचे असा प्रश्न होता, अशा परिस्थितीत शाळेतून ८० हजार रुपये फीस मागितली जात आहे, आम्ही एवढी रक्कम आणणार कोठून. आम्ही पालक आहोत, दररोज हातामध्ये झेंडा घेऊन रस्त्यावर उतरणारे लोक नाहीत’, अशा भावना पालकांनी व्यक्त केल्या.
चाणक्यपुरी समोरील पोदार इंटरनॅशनल स्कूलसमोर शैक्षणिक शुल्क वसुलीविरोधात काही पालकांनी मंगळवारी लाक्षणिक उपोषण केले. ‘पालकांवरील आर्थिक अत्याचार बंद करा’, ‘शाळेचा मनमानी कारभार बंद करा’ , ‘शिक्षा मेरा मौलिक अधिकार आपने बनाया इसे व्यापार’ असे फलकावर लिहिण्यात आले होते.
सुप्रिया देशपांडे यांनी सांगितले की, आम्ही मध्यमवर्गीय लोक आहोत. आम्ही कर देणारे लोक आहोत. कोरोना काळामध्ये मध्यमवर्गीय अडचणीत आले आहेत, मुलांना दररोज २ तास ऑनलाईन शिक्षण शाळा देते. आम्ही फीस भरण्यास तयार आहोत, शाळेने जेवढी सुविधा दिली जेवढे शिकविले तेवढीच फीस घ्यावी, अशी आमची मागणी आहे.
मनीष जैस्वाल यांनी सांगितले की, आता शाळा व्यवस्थापन आम्हाला धमकी देत आहे की, फीस भरली नाही तर तुमच्या मुलांची वार्षिक परीक्षा घेतली जाणार नाही, जेवढ्या सुविधा पुरविल्या तेवढी फीस घ्यावी, अशी आमची मागणी आहे. यासाठी मागील शिक्षणाधिकारी ते शिक्षण मंत्री यांचेपर्यंत पाठपुरावा केला आहे. मात्र, शाळा व्यवस्थापन फीसची रक्कम कमी करण्यास तयार नाहीत. यामुळे ११ ते ३ वाजेपर्यंत शाळेसमोर लाक्षणिक उपोषण केले. पोदार शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधला असता मीडियाशी बोलण्यास आम्हाला परवानगी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तर विभागीय आयुक्तालयासमोर उपोषण
फीसची रक्कम कमी करण्यास आम्ही शाळेच्या व्यवस्थापनाला आठवडाभराचा अवधी दिला आहे. या काळात जर शाळा व्यवस्थापनाने उत्तर दिले नाही तर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सर्व पालक उपोषणाला बसतील, असा निर्णय मंगळवारी पालकांनी घेतला.
- ललित माळी, पालक