साखळी उपोषण थांबवा, मुंबईला जाण्याची तयारी करा; मनोज जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन

By बापू सोळुंके | Published: December 25, 2023 04:55 PM2023-12-25T16:55:29+5:302023-12-25T16:56:04+5:30

आमच्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही मुंबईला येत आहे.

Stop chain hunger strike in villages; Prepare to go to Mumbai; Manoj Jarange's appeal to Maratha society | साखळी उपोषण थांबवा, मुंबईला जाण्याची तयारी करा; मनोज जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन

साखळी उपोषण थांबवा, मुंबईला जाण्याची तयारी करा; मनोज जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन

छत्रपती संभाजीनगर:मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यापासून गावागावांत सुरू केलेले साखळी उपोषण तात्काळ स्थगित करा, २० जानेवारीला मुंबईला जाण्याची तयारी करा, असे आवाहन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी येथे पत्रकारांशी बोलताना केली, असे असले तरी अंतरवाली सराटी येथील साखळी उपोषण मात्र सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रकृतीच्या कारणामुळे मनोज जरांगे पाटील हे रविवारी दुपारपासून शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सोमवारी सकाळी त्यांनी रुग्णालयात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, २० जानेवारी रोजी आपल्याला मुंबईला जायचे आहे, यामुळे आपल्याला घरी राहायचं नाही, आपल्याला आपल्या मुलांना आरक्षण द्यायचे आहे. यामुळे समाजबांधवांनी त्यांची कामे आवरून ठेवावी. देशात कधी झाला नाही, असा कार्यक्रम आपल्याला करायचा असल्याचे ते म्हणाले. 

मुक्कामाची व्यवस्था, रस्ता कसा असेल, मुंबईला जाण्यास किती दिवस लागतील, यासह सगळी माहिती समाजबांधवांना दिली जाईल. आपल्या आंदोलनात मुंगीही घुसता कामा नये, अशी ही तयारी असेल. मुंबईला जात असताना व्यवस्था असेल नसेल पण प्रत्येकाने तयारीने आंदोलनात सहभागी व्हावे, गाडीत झोपावे लागले तरी चालेल पण आपले आंदोलन यशस्वी करायचे आहे, हे आंदोलन शेवटचे असेल, असे आवाहनही जरांगे यांनी केले.

आम्हाला मुंबईला येण्याची हौस नाही
मला मुख्यमंत्र्यांना सांगायचे आहे की, आम्हाला मुंबईला येण्याची हौस नाही, सरकारकडून समाजाला सतत हुलकावणी देण्याचं काम सुरू आहे. आमच्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही मुंबईला येत आहे. मुंबईकडे कुच केल्याशिवाय मराठ्यांना पर्याय नाही. ओबीसी आरक्षणाचा ठरलं तसे कायदा पारित करुन समाजाला आरक्षण द्या, अशी आमची मागणी आहे.

क्युरेटीव पिटिशनच आरक्षण आम्ही नाकारलं नाही
एसईबीसी आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारने दाखल केलेली क्युरेटीव पिटिशन सर्वोच्च न्यायलायात प्रलंबित आहे. हे आरक्षण आम्ही नाकारलं नाही. पण हे आरक्षण टिकणार का, हा मोठा प्रश्न आहे. व्हीजेएनटी प्रमाणे आम्हाला टीकणारे आरक्षण हवे असल्याचे जरांगे पाटील यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना नमूद केले.

Web Title: Stop chain hunger strike in villages; Prepare to go to Mumbai; Manoj Jarange's appeal to Maratha society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.