प्राचीन वास्तूंची दुरवस्था थांबवा, विभागीय आयुक्तांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 07:50 PM2021-08-11T19:50:25+5:302021-08-11T19:50:59+5:30
या वास्तूंकडे धार्मिक अंगाने न पाहता कलेच्या, नाट्याच्या व नृत्याच्या अंगाने पाहण्याची व यासंदर्भात जबरदस्त जनजागृती करण्याची आवश्यकता
औरंगाबाद : मराठवाड्यातील प्राचीन वास्तूंची दुरवस्था थांबवून पर्यटनाला चालना द्या, असे साकडे बुधवारी येथे मराठवाडा प्राचीन वास्तू संवर्धन समितीने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना घातले.
समितीतर्फे सकाळी डॉ. प्रभाकर देव, डॉ. दुलारी कुरेशी, डॉ. सुरेश जोंधळे, डॉ. सतीश सोळुंके, लक्ष्मीकांत सोनवटकर, मल्हारीकांत देशमुख, सीमा पाध्ये, श्रीकांत उमरीकर व सारंग टाकळकर यांनी मराठवाड्यातील समृध्द वास्तूशिल्पांचा, शिलालेखांचा थोडक्यात आढावा घेतला. व सध्याच्या दुरवस्थेकडे पत्रकारांचे लक्ष वेधले. या दुरवस्थेला शासन, समाज असे सारेच घटक जबाबदार आहेत. या वास्तूंकडे धार्मिक अंगाने न पाहता कलेच्या, नाट्याच्या व नृत्याच्या अंगाने पाहण्याची व यासंदर्भात जबरदस्त जनजागृती करण्याची आवश्यकता या सर्वांनी व्यक्त केली. विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मराठवाड्याच्या संरक्षित स्मारक यादीत १८५ स्थळांचा समावेश आहे. पण याठिकाणी कुठलेच संरक्षण, संवर्धन, जतन आणि स्वच्छता अशी कामे झालेली आढळून येत नाहीत.
मंदिरांमध्ये व्होट्टल मंदिर समूह (जि. नांदेड), केदारेश्वर मंदिर (बीड), माणकेश्वर मंदिर (उस्मानाबाद), विठ्ठल मंदिर (लातूर), अन्वा मंदिर (जालना), अंबाजोगाई मंदिर समूह (बीड), चारठाणा मंदिर समूह आणि गुप्तेश्वर मंदिर (परभणी), खडकेश्वर महादेव मंदिर (जालना) तसेच किल्ल्यांमध्ये अंतूर (औरंगाबाद), वेताळवाडी (औरंगाबाद) परंडा (उस्मानाबाद), धारुर (बीड), कंधार (नांदेड), औसा आणि उदगीर (लातूर) आणि लेण्यांमध्ये पितळखोरा व घटोत्कच (औरंगाबाद), धाराशिव (उस्मानाबाद), खरोसा (लातूर) या प्राचीन वास्तूंची कामे होणे अत्यंत गरजेचे असल्याचे विभागीय आयुक्तांच्या लक्षात आणून देण्यात आले.