मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबेना; साडेचार महिन्यांत ३२९ जणांनी संपवली जीवनयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 06:46 PM2018-05-09T18:46:34+5:302018-05-09T18:47:06+5:30
मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याचे चित्र आहे. मागील साडेचार महिन्यांत ३२९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याचे चित्र आहे. मागील साडेचार महिन्यांत ३२९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची ओरड आहे.
नापिकी, दुष्काळ व कर्जबाजारीतून सावरण्यासाठी शासकीय योजनांचा तरी शेतकऱ्यांना लाभ मिळावा, यासाठी प्रशासकीय यंत्रणाही खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहत नसल्याचे चित्र आहे. परिणामी चोहोबाजूंनी होरपळलेला शेतकरी आत्महत्येकडे वळतो आहे, अशी भयावह परिस्थिती एकीकडे आहे, तर दुसरीकडे भाजपचे लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे त्यांची वैयक्तिक कारणे असल्याची विधाने करीत आहेत. ३२९ आत्महत्या झाल्याचा अहवाल महसूल विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्यातील १६५ प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली आहेत. ८० प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. चौकशीसाठी ८४ प्रलंबित आहेत. १ कोटी ६५ लाख रुपयांची मदत शासनाने शेतकरी कुटुंबियांना दिली आहे.
आत्महत्येची विभागनिहाय आकडेवारी
जिल्हा आत्महत्या
औरंगाबाद ५४
जालना ३१
परभणी ४३
हिंगोली २६
नांदेड ३०
बीड ६०
लातूर ३३
उस्मानाबाद ५२
....................
एकूण ३२९