आता बस्स् ! मायबाप सरकार निर्बंध उठवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:02 AM2021-07-27T04:02:11+5:302021-07-27T04:02:11+5:30
औरंगाबाद : औरंगाबादेत दररोज निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या घटली आहे. उपचार सुरु असलेल्या रुग्णांचेही प्रमाण कमी आहे. मात्र, तरीही ...
औरंगाबाद : औरंगाबादेत दररोज निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या घटली आहे. उपचार सुरु असलेल्या रुग्णांचेही प्रमाण कमी आहे. मात्र, तरीही रोज ४ च्या आत घरात आणि शनिवारी, रविवारी लाॅकडाऊन, अशी व्यापाऱ्यांची स्थिती झाली आहे. परिणामी, २० ते ३० टक्क्यांवर व्यवसाय आला आहे. पुण्यात निर्बंध कमी करण्याचे संकेत मिळतात, मग औरंगाबादेत का नाही, असा सवाल उपस्थित करीत औरंगाबादेतील निर्बंध उठवा, अशी मागणी आता व्यापारी, व्यावसायिक आणि कामगारांतून जोर धरत आहे.
तिसऱ्या लाटेचे आणि डेल्टा प्लसचे संकट उभे राहिल्यानंतर नियमावली बनवण्यात आली आणि त्यामध्ये बाजारपेठेवर वेळेचे निर्बंध आणण्यात आले. याविषयी व्यापाऱ्यांनी स्थानिक प्रशासन, पालकमंत्री व लोकप्रतिनिधी यांना वेळोवेळी निवेदन देऊन बाजारपेठेची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत करण्याची आणि शनिवारी, रविवारी बाजारपेठ उघडी ठेवण्याची मागणी करण्यात आली. जिल्ह्यामध्ये सध्या कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. डेल्टा प्लसचा कोणताही रुग्ण जिल्ह्यात आढळलेला नाही. मात्र, तरीही विविध प्रकारचे निर्बंध लावून व्यापारी, त्यांच्यावर अवलंबून असणारे कामगार आणि कुटुंबीयांना वेठीस धरले जात आहे. गंभीर परिस्थिती नसतानाही व्यापारी, कामगारांच्या पोटावर पाय दिला जात असल्याची ओरड होत आहे. परंतु आता निर्बंध उठविले पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.
पुणे सुरु होत असेल तर औरंगाबादही सुरु करावे
पुण्यातील निर्बंध कमी करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी दिले. तेथे संध्याकाळी ७ पर्यंत दुकाने खुली ठेवण्याची मुभा राहणार आहे. औरंगाबादचा पाॅझिटिव्हिटी रेट पुण्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे पुणे सुरु होणार असेल तर औरंगाबादही ७ वाजेपर्यंत सुरु ठेवले पाहिजे. शनिवारी, रविवारीही बाजारपेठ खुली पाहिजे. पाॅझिटिव्हिटी रेट वाढला नाही तर पूर्ण निर्बंध शिथिल केले पाहिजे.
- जगन्नाथ काळे, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ
------
६० टक्के व्यवसायाचे नुकसान
व्यवसाय हा सायंकाळी आणि शनिवारी, रविवारीच असतो. परंतु निर्बंधांमुळे ६५ टक्के व्यवसाय बुडत आहे. ज्या ठिकाणी दोनशे ते तीनशे रुग्ण आढळत आहेत, तेथे निर्बंध नाही. पण, आपल्याकडे २० ते २५ रुग्ण आढळत असतानाही निर्बंध आहे. शनिवारी, रविवारी दुकाने बंद ठेवावी लागतात. त्यामुळे नोकरदारांना खरेदीही करता येत नाही. त्यामुळे निर्बंध उठवले पाहिजे.
- विनोद लोया, अध्यक्ष, कापड व्यापारी संघटना
------
शहराबाहेरील ग्राहकांची पाठ
शहराबाहेरून येणारा ग्राहक निर्बंधामुळे शहरात येत नाही. त्यामुळे उलाढाल ठप्प होत आहे. कामगार रात्री ८ वाजेपर्यंत काम करीत असे. पण आता ४ तास कमी झाले आहे. शनिवार, रविवारी दुकाने उघडता येत नाही. त्यामुळे कामगारांच्या वेतनावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांचेही नुकसान हाेत आहे. त्यामुळे निर्बंध हटविले पाहिजे.
- संतोष कावले, अध्यक्ष, औरंगाबाद जिल्हा ऑटोमोबाईल ॲण्ड टायर डिलर्स असोसिएशन