अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला
By Admin | Published: January 29, 2017 11:54 PM2017-01-29T23:54:38+5:302017-01-29T23:58:31+5:30
धारूर : तालुक्यातील गोपाळपूर येथे रविवारी एका मुलीचा बालविवाह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे रोखण्यात आला
धारूर : तालुक्यातील गोपाळपूर येथे रविवारी एका मुलीचा बालविवाह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे रोखण्यात आला. नवरा-नवरी बोहल्यावर चढणार तोच अधिकारी गावात आले. त्यामुळे हा विवाह होऊ शकला नाही.
लग्नमंडप... सनईचे मंजूळ सूर... जेवणावळी... पाहुण्यांची रेलचेल... अशा वातावरणातच गोपाळपूर येथे रविवारी गोरज मुहूर्तावर एका विवाह सोहळ्याची लगबग सुरू होती. शेती व मजुरी करणाऱ्या कुटुंबातील मुलीचा विवाह गोपाळपूरपासून जवळच असलेल्या संभाजीनगर येथील एका रिक्षाचालकाशी होणार होता. परण्याही निघाला. मात्र, तेवढ्यात तहसीलदार राजाभाऊ कदम, सहायक निरीक्षक गजानन तडसे, विस्तार अधिकारी ए.बी. चौरे, ‘बेटी बचाव-बेटी पढाव’चे तत्त्वशील कांबळे हे गोपाळपुरात पोहोचले.
मुलाचे वय विवाहयोग्य असल्याचे स्पष्ट झाले; मात्र मुलीचे वय १७ वर्षे भरत होते. त्यामुळे हा विवाह करता येणार नाही, असे अधिकाऱ्यांनी बजावले. यावेळी वधुपित्याकडून लेखी घेण्यात आले. त्यानुसार मुलीचे वय १८ वर्षे झाल्यानंतरच हा विवाह होणार आहे. (वार्ताहर)