स्थलांतर रोखा, रोहयोची कामे वाढवा...!
By Admin | Published: November 24, 2014 12:06 AM2014-11-24T00:06:54+5:302014-11-24T00:36:24+5:30
बीड : नूतन सीईओ नामदेव ननावरे यांनी रविवारी सुटीच्या दिवशीही बैठक, विभागांची पाहणी व गावभेटी करत प्रत्यक्ष कामकाजाचा श्रीगणेशा केला.
बीड : नूतन सीईओ नामदेव ननावरे यांनी रविवारी सुटीच्या दिवशीही बैठक, विभागांची पाहणी व गावभेटी करत प्रत्यक्ष कामकाजाचा श्रीगणेशा केला. जिल्ह्यात दुष्काळी स्थिती आहे. रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखून गावातच रोहयोची कामे उपलब्ध करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात रविवारी सकाळी झालेल्या बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) आर. आर. भारती, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी. एम. ढोकणे, नरेगाचे गटविकास अधिकारी एम. जे. शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीच्या सुरुवातीला सर्व अधिकाऱ्यांशी परिचय करुन घेतला. त्यानंतर सीईओ ननावरे यांनी सर्व विभागांचा आढावा घेतला.
यावेळी ननावरे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या विविध योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. त्यात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. पाणी, चारा, धान्य याची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.
मात्र, दुष्काळी पार्श्वभूमीवर योग्य त्या उपाययोजना करुन सामान्यांना दिलासा देण्याचे काम केले पाहिजे, असे ते म्हणाले. रोहयोची कामे तत्काळ उपलब्ध करुन द्या, मजुरांचे स्थलांतर रोखा; परंतु हे करताना बोगसगिरीला थारा देऊ नका, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मुख्यालय सोडू नका, सोडण्यापूर्वी वरिष्ठांना कळवा, असे फर्मानही त्यांनी अधिकाऱ्यांना सोडले. आर. आर. भारती यांचेही मार्गदर्शन झाले. यावेळी गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
पौंडूळला भेट
शिरुर तालुक्यातील पौंडूळ येथील ग्रामपंचायतीला सीईओ नामदेव ननावरे यांनी भेट दिली. यावेळी संग्राम कक्षात कागदपत्रांच्या योग्य त्या नोंदी व्हाव्यात. तेथून सर्व प्रमाणपत्रे उपलब्ध व्हावेत, असे त्यांनी सांगितले.
शिवाय घर तिथे स्वच्छतागृह बांधलेच पाहिजे. सदृढ आरोग्यासाठी शौचालय बांधून घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी. एम. ढोकणे, सहायक गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)