जिभेचे लाड थांबवा, अतितिखट, मसालेदार पदार्थांमुळे होऊ शकतो अल्सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:03 AM2021-09-03T04:03:01+5:302021-09-03T04:03:01+5:30
औरंगाबाद : दररोजच्या जेवणात जर अतितिखट आणि मसालेदार पदार्थांचा समावेश असेल, तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. सातत्याने हे ...
औरंगाबाद : दररोजच्या जेवणात जर अतितिखट आणि मसालेदार पदार्थांचा समावेश असेल, तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. सातत्याने हे पदार्थ आहारात असल्यास अल्सरला सामोरे जाण्याची जास्त शक्यता असते. त्याकरिता जिभेचे लाड थांबवा आणि सकस आहारच घ्या, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
बदलत्या जीवनशैलीने जेवणाच्या वेळा पाळणे अशक्य होत आहे. रोजच्या आहारात जंकफूड, अतितिखट, मसालेदार पदार्थांचा समावेश वाढत आहे. परिणामी, अनेकांना अल्सरच्या दुखण्याला सामोरे जावे लागत आहे. अल्सर होण्यासाठी असलेल्या अनेक कारणांमध्ये सातत्याने तिखट, मसालेदार पदार्थ खाणे, हेही एक कारण आहे. अल्सर म्हणजे सर्वसाधारणपणे एक प्रकारची जखमच. सर्वसाधारणपणे या जखमा जठराला किंवा लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागात (ड्युओडेन) होतात. औषधी, गोळ्यांनी अल्सर बरा होतो; परंतु गुंतागुंत अवस्था, रक्तस्राव आणि लहान आतडे एकदम छोटे झाल्यास शस्त्रक्रिया करण्याची वेळ ओढावली जाते.
काय आहेत लक्षणे........................
- पोट दुखणे, जळजळ होणे, मळमळ होणे, उलट्या होणे, भूक मंदावणे, वजनात अचानक घट होणे, दुखण्यामुळे रात्रीतून उठून बसणे, उलटीतून रक्त पडणे आदी.
------
काेणती काळजी घ्यावी?
१) वेळेवर जेवण घेतले पाहिजे. कमी प्रमाणात तिखट खावे. अत्यावश्यक असेल तरच डाॅक्टरांच्या सल्ल्याने वेदनाशमन गोळ्या घेतल्या पाहिजे, असे घाटीतील शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डाॅ. सरोजिनी जाधव यांनी सांगितले.
२) अनियमित खाण्याची सवय बदलली पाहिजे. धूम्रपान, मद्यपान आणि रात्रीचे जागरण टाळले पाहिजे.
३) सध्या चांगल्या प्रकारची औषधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेची वेळ टळण्यास मदत होते. १० ते २० टक्के लोकांना गुंतागुंत स्थितीमुळे शस्त्रक्रिया करण्याची वेळ ओढावते.
------
पौष्टिक आहार हाच महत्त्वाचा
वेळेवर झोप घेणे, वेळेवर सकस आहार घेणे हे अधिक महत्त्वाचे आहे. दैनंदिनी कशी आहे, यावर आरोग्य अवलंबून असते. त्यामुळे नियमित व्यायाम केला पाहिजे. वेळेवर झोप घेतली पाहिजे.
- डाॅ. पंकज वैरागड, घाटी रुग्णालय
----
दररोज अतितिखट, मसालेदार, जंकफूड खाल्ले, तर निश्चितच कधी ना कधी त्याचा शरीरावर परिणाम होतो. हे पदार्थ रोज खाणे टाळले पाहिजे. आतडी, जठराला जखम झालेली असेल, तर भात, खिचडी असे मऊ पदार्थ खावेत.
- रश्मी जोशी, आहारतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय