सॉ मिल्सचा पाणीपुरवठा मनपा करणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 12:31 AM2017-12-22T00:31:59+5:302017-12-22T00:32:06+5:30
शहरातील वाढत्या प्रदूषणाला सॉ मिल्स कारणीभूत असून, त्यांचा तातडीने पाणीपुरवठा बंद करण्यात यावा, असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने महापालिकेला दिले आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील वाढत्या प्रदूषणाला सॉ मिल्स कारणीभूत असून, त्यांचा तातडीने पाणीपुरवठा बंद करण्यात यावा, असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार सॉ मिल्सचा पाणीपुरवठा आठवडाभरात बंद करण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला नोटीस बजावून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. महापालिकेने कृती आराखडा तयार करून त्यावर कारवाई करण्यात येईल, असे मंडळाला कळविले आहे. मात्र अद्याप उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. असे असताना गुरुवारी राष्ट्रीय हरित लवादाचे पत्र महापालिकेला प्राप्त झाले. त्यात औरंगाबाद शहरातील प्रदूषणाला सॉ मिल्सदेखील कारणीभूत असल्याचे नमूद करून त्यांचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शहरात ५४ हून अधिक सॉ मिल्स
शहरात ५४ हून अधिक सॉ मिल्सची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. त्या ठिकाणी होणाºया लाकडाच्या कटाईमुळे निर्माण होणारी धूळ नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक आहे. राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश प्राप्त होताच पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे.
४५४ सॉ मिल्सची झोननिहाय विभागणी करून उपअभियंत्यांमार्फत पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.