निष्पाप आंदोलकांचे अटकसत्र थांबवा; मराठा समाज वर्गणी करून शासनाची नुकसानभरपाई देईल!
By बापू सोळुंके | Published: November 7, 2023 11:53 AM2023-11-07T11:53:57+5:302023-11-07T11:55:53+5:30
सकल मराठा समाजाची मागणी : बीड जिल्ह्यात सुरू असलेले निष्पाप आंदोलकांचे अटकसत्र थांबवा
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यात शांततेत उपोषण, निदर्शने करणाऱ्या निष्पाप तरुणांनाच पोलिस टार्गेट करून जाळपोळीच्या गुन्ह्यात धरपकड करीत आहेत. तुमची नुकसानभरपाई मराठा समाज एक - एक रुपया वर्गणी करून भरून देईल; पण, हे अटकसत्र थांबवावे, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली.
प्रा. चंद्रकांत भराट म्हणाले की, मागील दोन महिन्यांपासून मराठा समाज संपूर्ण राज्यात आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण, बेमुदत उपोषण, निदर्शने आणि धरणे आंदोलनासह विविध आंदोलने करीत आहे. या आंदोलनाला गालबोट लागावे म्हणून काही समाजकंटकांनी बीड जिल्ह्यात जाळपोळ केली. ही जाळपोळ करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी. मात्र, या कारवाईच्या नावाखाली आमच्या निष्पाप आंदोलकांची धरपकड का करता, असा सवाल त्यांनी केला. केवळ सरकारविरोधात आंदोलन केल्याचा राग मनात धरून पोलिस तरुणांना पकडून नेऊन पोलिस ठाण्यात बेदम मारहाण करीत असल्याचे प्रा. भराट यांनी सांगितले. हे रोखण्यासाठी उद्या विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण आणि विभागीय आयुक्त यांना भेटणार असल्याचे यावेळी सुरेश वाकडे यांनी सांगितले. यावेळी सुनील कोटकर यांनी बीड जिल्ह्यातील एका तरुणाने त्यांना फोन करून सांगितलेली आपबिती ऐकविली. या पत्रकार परिषदेला सुकन्या भोसले, शैलेश भिसे आदींसह मराठा समाजातील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
पाच हजार तरुण झाले भूमिगत
यामुळे बीड जिल्ह्यातील विविध गावांतील सुमारे पाच हजार तरुण चुकीच्या अटकेच्या भीतीपोटी गावात जात नसल्याचे चित्र आहे. ऐन सणासुदीत पोलिसांनी सुरू केलेले हे अटकसत्र तत्काळ थांबवावे, अशी आमची मागणी आहे.
छगन भुजबळ यांच्या विरोधात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करणार
मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य करीत आहेत. शिवाय मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयावरच ते मंत्री असून टीका करीत आहेत. यामुळे त्यांची पक्षप्रमुखांकडे तक्रार करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित देशमुख यांनी सांगितले.