फुलंब्री तालुक्यात दोन ठिकाणी रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 12:34 AM2018-08-02T00:34:10+5:302018-08-02T00:34:22+5:30
तालुक्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन सुरूच आहे. बुधवारी पिंपळगाव गांगदेव व औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील बिल्डा फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला. यात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
फुलंब्री : तालुक्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन सुरूच आहे. बुधवारी पिंपळगाव गांगदेव व औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील बिल्डा फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला. यात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पिंपळगाव गांगदेव येथे सुमारे अर्धा तास चाललेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी या विभागाचे आमदार हरिभाऊ बागडे, खा. रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनाम द्यावा, अशा घोषणा दिल्या. यानंतर बिल्डा फाट्यावर ४० मिनिटे रास्ता रोको करण्यात आला. यावेळी तहसीलदार संगीता चव्हाण यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनप्रसंगी महामार्गावर दोन्ही बाजंूनी शेकडो वाहने थांबली होती.
रजापूर येथे बंद, मुंडन आंदोलन
आडूळ : सकल मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी सकाळी रजापूर येथे सकल मराठा समाज बांधवांतर्फे रास्ता रोको व मुंडन आंदोलन करण्यात आले व दुपारपर्यंत कडकडीत बंदसुद्धा पाळण्यात आला. काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून मराठा आरक्षणासाठी शेकडो बांधवांनी सामूहिक मुंडन आंदोलन करत शासनाचा निषेध केला.
यावेळी रजापूरसह, घारेगाव, हिरापूर, एकतुनी, देवगाव, दाभरुळ, आडगाव, ब्राम्हणगाव येथील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन नायब तहसीलदार नानासाहेब फोलाने, सपोनि. अभिजित मोरे, मंडळ अधिकारी भारती मादनकर, तलाठी भरत सावणे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
महामार्गावर वाहनांच्या रांगा
आंदोलन सुरू असताना सकाळी लवकर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व रुग्ण घेऊन जाणाºया वाहनांना तरुणांनी रस्ता मोकळा करून दिला होता. या आंदोलनामुळे या महामार्गावरील वाहतुकीच्या रांगा तब्बल दोन किलोमीटरपर्यंत लागल्या होत्या. सदरील आंदोलन शांततेत पार पडले. यावेळी राज्य राखीव पोलीस दल, दंगाकाबू पथक व पाचोड पोलीस ठाण्याच्या वतीने सपोनि. अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार कल्याण राठोड, कल्याणराव जिगे पाटील, निवृत्ती मदने, रामदास राख, गोरखनाथ कणसे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शेवटी राष्ट्रगीताने या आंदोलनाची सांगता झाली.