रस्त्यासाठी बन्नाळीकरांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:32 AM2017-08-29T00:32:38+5:302017-08-29T00:32:38+5:30
तालुक्यातील बन्नाळी राज्य मार्गाच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून नागरिकांना ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागते. चार वर्षांपूर्वी पावसाळ्यात मायलेकी वाहून गेल्या होत्या. तथापि, संबंधितांनी लक्ष न दिल्याने सरपंच साई पाटील बन्नाळीकर यांच्या नेतृत्वाखाली २८ आॅगस्ट रोजी बन्नाळी चौकात नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
धर्माबाद : तालुक्यातील बन्नाळी राज्य मार्गाच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून नागरिकांना ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागते. चार वर्षांपूर्वी पावसाळ्यात मायलेकी वाहून गेल्या होत्या. तथापि, संबंधितांनी लक्ष न दिल्याने सरपंच साई पाटील बन्नाळीकर यांच्या नेतृत्वाखाली २८ आॅगस्ट रोजी बन्नाळी चौकात नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.
बन्नाळी येथील राज्यमार्गाची दुरवस्था झाली. लेंडी नदीच्या पुलाचीही अवस्था चांगली नाही. पाणी जाण्याचा मार्ग लहान असल्याने वाहनधारकांची मोठी कसरत होत आहे. राज्यमार्ग तेलंगणाला जोडला आहे. चार वर्षांपूर्वी सदरच्या पुलावरुन मायलेकी वाहून गेल्याची घटना घडली होती.
बन्नाळी ते धर्माबाद मार्गावरील बन्नाळीलगत ६०० मी़चा रस्ता मंजूर झालेला आहे़ त्याचे काम एका एजन्सीला देण्यात आले, मात्र काम सुरु करण्यास टाळाटाळ झाल्याने बन्नाळीकर संतप्त झाले. संबंधित एजन्सीवर कार्यवाही करावी, अशी मागणी करुन नागरिकांंनी रास्ता रोको आंदोलन केले.
यावेळी प्रशासनाकडून बन्नाळी गावाजवळ गट ‘फ’ अंतर्गत मंजूर असलेले डांबरीकरण ६०० मीटर लांबीचे १ नोव्हेंबर २०१७ पासून सुरू करण्यात येईल, तसेच बन्नाळी ते बन्नाळी चौकापर्यंत दोन नळकांडी नाल्याची निविदा निघाली असून निविदा संबंधित गुत्तेदारास मिळताच काम त्वरित सुरू करण्यात येईल, असे धर्माबादच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने लेखी स्वरुपात दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायती बन्नाळीचे सरपंच साई पाटील बन्नाळीकर, महाबळेश्वर पाटील, संदीप पाटील, दिगंबर खपाटे, साईनाथ चपळे, साईनाथ देवीदास चपळे, लक्ष्मण निदानकर, नीलेश तुकडेकर, पवन पाटील, चक्रेश पाटील, मंडगे महादु, विनायक मंडगे, प्रभुकांत हंगीरगेकर, बाबू तुकडेकर, पंदीरे गंगाधर, पिराजी खपाटे उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक अंगद सुडके, पोलीस उपनिरीक्षक मल्हारे बोधने, सलीम पठाण, चंपती कदम, पीएसआय जोंधळे, नल्लेवाड आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.