कांदा लिलाव बंद पाडून रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 01:17 AM2018-02-28T01:17:10+5:302018-02-28T01:19:31+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी सकाळच्या सत्रात कमी भाव पुकारल्याच्या कारणावरुन संतप्त शेतकºयांनी कांदा लिलाव बंद पाडून नागपूर- मुंबई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैजापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी सकाळच्या सत्रात कमी भाव पुकारल्याच्या कारणावरुन संतप्त शेतकºयांनी कांदा लिलाव बंद पाडून नागपूर- मुंबई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. गोंधळ उडाल्याने वैजापूर पोलिसांच्या मध्यस्थीने पाच तासानंतर लिलाव पूर्ववत झाले.
दोन दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने वैजापूर बाजार समितीच्या आवारात कांद्याची प्रचंड आवक येत असून बाजार समितीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात वाहने उभी आहेत.
मंगळवारी कांद्याला कमीत कमी ३००, सरासरी ७०० तर जास्तीत जास्त ८५० रुपये क्विंटल भाव पुकारल्याने संतप्त शेतकºयांनी सकाळी अकरा वाजता लिलाव बंद पाडून थेट रास्ता रोको आंदोलन केल्याने महामार्गावर वाहतुकीची चांगलीच कोंडी झाली होती.
पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, सहायक पोलीस निरीक्षक रामहरी जाधव, पोलीस नाईक संजय घुगे यांनी शेतकºयांची समजूत काढून त्यांना बाजार समितीच्या आवारात नेले. बाजार समितीचे सचिव विजय सिनगर, संचालक सुरेश तांबे यांनी बाजार आवारात जाऊन रियाज अकील शेख, शकील शेख, आजम सौदागर व इतर व्यापाºयांशू चर्चा करुन दुपारी साडेतीन नंतर लिलाव सुरु केले. पाच तासाच्या गोंधळानंतर लिलाव पूर्ववत सुरु झाले. यावेळी कांद्याला २०० ते ३०० रुपये क्विंटलमागे वाढीव भाव मिळाला.
होळी सणामुळे आठ दिवस मार्केट बंद राहणार असून त्यामुळे भाव पडण्याची भीती व उन्हाच्या चटक्यामुळे चाळीतील कांदे सडण्याची शक्यता यामुळे धास्तावलेल्या शेतकºयांनी कच्चा व अपरिपक्व कांदा बाजारात विक्रीसाठी आणला. मंगळवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटमध्ये एकाच दिवशी नवीन हळव्या कांद्याची तब्बल ३०० ते ३५० ट्रक आवक झाली. यामुळे व्यापाºयांनी कांद्याचे दर पाडले.
३०० ते ३५० वाहनांची आवक
गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून बाजारात कांद्याची आवक कमी होती. त्यात नवीन कांद्याचा नवीन हंगाम सुरू झाला नसल्याने व जुन्या कांद्याची आवक घटल्याने कांद्याच्या दराने उच्चांकी गाठली होती. यामुळे चांगला दर मिळेल, या अपेक्षेने शेतकºयांनी कच्चा कांदाच मोठ्या प्रमाणात बाजारात आणला आहे. यामुळे मंगळवारी खुल्या कांद्याची तब्बल ३०० ते ३५० वाहनात उच्चांकी आवक झाली. आवक वाढल्याने व कांदा कच्चा असल्याने दर कमी झाले, असे सचिव विजय सिनगर यांनी सांगितले.
नवीन कांद्याची आवक वाढली
च्गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून कांद्याला चांगला भाव मिळत आहे. यंदा तालुक्यात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे या दिवसात कांदा लवकर खराब होतो व मोड येतात. त्यामुळे येथील शेतकरी कांदा साठविण्याच्या भानगडीत पडत नाहीत. त्यात कांद्याला सध्या चांगले दर मिळत असल्याने या परिसरातील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात नवीन कांदा बाजारात आणला आहे. या कांद्याला वजनदेखील चांगले असते, यामुळे कांद्याची आवक वाढून दर कमी झाले.