थकबाकीमुळे पथदिवे बंद
By Admin | Published: March 26, 2017 10:57 PM2017-03-26T22:57:55+5:302017-03-26T23:00:47+5:30
बीड : वीज ग्राहकांबरोबरच शासकीय कार्यालयांकडे महावितरणच्या थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस फुगत आहे
बीड : वीज ग्राहकांबरोबरच शासकीय कार्यालयांकडे महावितरणच्या थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस फुगत आहे. मार्च अखेरच्या अनुषंगाने वसुली मोहिमेत न.प.चे सहकार्य होत नसल्याने पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची नामुष्की आली आहे. पथदिव्यापोटी नगरपालिकेच्या विद्युत विभागाकडे ५७ कोटी ३१ लाख रूपये एवढी थकबाकी आहे.
ग्राहकांबरोबरच शासकीय कार्यालयांनी बिले अदा करावीत या मागणीसाठी अधीक्षक अभियंता रतन सोनुले, कार्यकारी अभियंता जी. बी. घोडके यांनी शासकीय कार्यालयांना पत्रव्यवहार केला आहे. सोबतच प्रत्यक्ष भेटीवरही भर दिला. नगरपालिकेकडून मात्र थकबाकीचे मुद्दल डावलून केवळ महिन्याकाठी केवळ १२ ते १३ लाख रूपये महावितरणच्या कपाळी मारले जात आहेत. ही रक्कम तर व्याजापोटीच जमा होत आहे. शहरात पथदिव्यांचे कनेक्शन २५० ठिकाणी असून, जवळपास ३ हजारावर पथदिवे आहेत.
मार्चअखेरची वसुली अंतिम टप्प्यात असून, वाढीव थकबाकी असलेल्या कार्यालयांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून आले आहेत. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून सहयोगनगर, सुभाष रोड, शिवाजी चौक, नगर रोड या मुख्य बाजारपेठेतील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजबिल अदा न केल्यास ही केवळ अखंडितपणे सुरू राहणार असल्याचे अधीक्षक अभियंता रतन सोनुले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)