मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांना पोलिसांनी गंगापूर येथेच रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 04:50 PM2020-07-23T16:50:17+5:302020-07-23T16:51:57+5:30
पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन काही वेळानंतर मुक्त केले.
गंगापूर : मराठा क्रांती मोर्चातर्फे ‘बलिदान ते आत्मबलिदान’ आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी आंदोलन स्थळापासून ७ किमी अंतरावर गंगापूर फाटा येथे ताब्यात घेतले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळपासूनच पोलिसांनी गोदावरी नदीवरील आंदोलन स्थळाकडे जाणारे सर्व मार्ग बंद केले होते. त्यामुळे एकही आंदोलक गोदावरी नदीवरील स्मृती स्थळापर्यंत पोहोचू शकला नाही. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन काही वेळानंतर मुक्त केले.
गंगापूर फाट्यावर पोलीस बंदोबस्त असल्यामुळे येणाऱ्या प्रत्येक आंदोलकाला येथे थांबवण्यात आले. सकाळी ११ वाजेच्या सुमारास आंदोलकांना तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी ३० जुलैला मुंबई येथे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना मागण्यांवरील चर्चेसाठी बोलावले असल्याचे पत्र दिले. दरम्यान, आंदोलकांना ताब्यात घेऊन काही वेळानंतर मुक्त केले. यानंतर शहरातील एका कार्यालयात काकासाहेब शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील गंगापूर येथे हजर होत्या. तसेच अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे, उपविभागीय अधिकारी संदीप सानप, डीवायएसपी संदीप गावित, पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव, मच्छिंद्र सुरवसे यांच्यासह पैठण, वैजापूर आणि गंगापूर येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा बंदोबस्त होता.
वाहतूक खोळंबली
दरम्यान, औरंगाबाद-पुणे या मार्गावरील प्रवाशांची मोठी अडचण झाली. ठिकठिकाणी नियमित माल वाहतूक करण्याऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहनचालकांनी १०० ते १५० किलोमीटरचा फेरा करण्यापेक्षा दिवसभर या ठिकाणी थांबून सायंकाळी पुढे मार्गस्थ होऊ, असे स्पष्ट केले.