स्मार्ट बससाठीची स्थानक उकिरड्यात; औरंगाबादकरांची मनपा करतेय थट्टा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 03:47 PM2018-12-19T15:47:16+5:302018-12-19T15:53:14+5:30

या बसचा लोकार्पण सोहळा २३ डिसेंबर रोजी आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Stops for smart bus are like rattles; Municipalities joke with Aurangabadkar's | स्मार्ट बससाठीची स्थानक उकिरड्यात; औरंगाबादकरांची मनपा करतेय थट्टा 

स्मार्ट बससाठीची स्थानक उकिरड्यात; औरंगाबादकरांची मनपा करतेय थट्टा 

googlenewsNext
ठळक मुद्देमनपा प्रशासनाला बससेवा सुरू करण्याची लगीनघाईसर्व बसस्थानके मोडकळीस आलेली आहेत.

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजनेसाठी दिलेल्या निधीतून १०० स्मार्ट बस खरेदी करण्यात आल्या आहेत. या बसचा लोकार्पण सोहळा २३ डिसेंबर रोजी आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शहर बस सुरू करण्यासाठी महापालिका प्रशासनाची जोरदार घाई सुरू आहे. शहरात एकही बसस्थानक प्रवाशांना उभे राहण्यायोग्य नाही. सर्व बसस्थानके मोडकळीस आलेली आहेत. काही ठिकाणी तर उकिरड्याप्रमाणे वापर सुरू आहे. प्रवाशांनी भर रस्त्यावर बसची वाट पाहत उभे राहावे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

महापालिका प्रशासनाने नेहमीच औरंगाबादकरांच्या जखमेवर मलम नव्हे तर मीठ चोळण्याचे काम केले आहे. समांतर जलवाहिनी, भूमिगत गटार, कचरा प्रश्न, १०० कोटींचे रस्ते, अशा प्रत्येक विकासकामाचा सत्यानाशच केला आहे. केंद्र शासनाने दिलेल्या निधीतून तब्बल १०० बस खरेदी करण्यात आल्या. ३६ कोटी रुपये यावर खर्च करण्यात आले. शहर बस शहराची गरज होती, ही वस्तुस्थिती आहे. बससेवा सुरू करण्यापूर्वी काही नियोजनही करावे लागते याचा विसर मनपा प्रशासनाला पडला आहे. बस चालविण्यासाठी मनपाकडे यंत्रणा नाही, म्हणून एसटी महामंडळाच्या माथी ही सेवा मारण्यात आली.  दुसरी महत्त्वाची जबाबदारी म्हणजे शहरातील लाखो नागरिक उद्या बसने प्रवास करतील. त्यांना ठिकठिकाणी बसची वाट पाहण्यासाठी उभे राहावे लागेल. त्यासाठी बसस्थानाके लागतात. १०० बसला किती बसस्थानके लागतील, याचाही मनपाला अंदाज नाही.

अतिरिक्त आयुक्तांचे कानावर हात
शहर बस सुरू करण्यासाठी मनपाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. बसस्थानकांचे काय? या थेट प्रश्नावर अतिरिक्त आयुक्त संतोष कवडे यांनी कानावर हात ठेवले. मी या मुद्यावर काहीही प्रतिक्रिया देणार नाही. बससेवा सुरू करण्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन मार्ग, तिकीट दर आदी माहिती देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

एएमटीची ६२ बसस्थानके
अकोला प्रवासी वाहतूक संस्थेने २००७-०८ मध्ये लालपरीच्या नावाने शहर बस सेवा सुरू केली होती. या संस्थेने शहरात तब्बल ६२ बसस्थानके उभारली होती. बसस्थानकांची जागा मनपाने निश्चित करून दिली होती. त्यातील पन्नास टक्के बसस्थानके प्रवाशांच्या कोणत्याच कामाची नव्हती. चुकीचे ठिकाण मनपाने निवडले होते. एक बसस्थानक उभारण्यासाठी संस्थेने तब्बल ७० हजार रुपये खर्च केले होते. आजही बसस्थानक अकोला प्रवासी वाहतूक संस्थेच्या मालकीचे आहेत.

निव्वळ घोषणांचा पाऊस
शहर बस सुरू करण्याचा निर्णय घेतल्यावर महापालिका प्रशासनाने घोषणांचा पाऊस पाडला होता. शहरातील प्रत्येक रस्त्यावर स्मार्ट बसस्थानक राहील. त्यात डिजिटल बोर्ड राहतील, वायफाय सुविधा राहील, बस किती मिनिटांनंतर येणार, याची माहिती मिळेल, असे सांगण्यात आले होते. आता लोकार्पणाची वेळ आली तरी महापालिकेने एकही बसस्थानक सुसज्ज केलेले नाही.

Web Title: Stops for smart bus are like rattles; Municipalities joke with Aurangabadkar's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.