पैठणमध्ये नाथषष्ठी सोहळ्याची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:38 AM2018-03-10T00:38:26+5:302018-03-10T00:38:55+5:30
खडकी सोडियेला मोटा। अजीचा दहीकाला गोमटा ।। घ्यारे घ्यारे दहीभात। आम्हा देतो पंढरीनाथ ।। ऐन सूर्यास्ताच्या समयी टाळ-मृदंगाच्या गजरात भानुदास-एकनाथांच्या जयघोषात नाथ मंदिरातील काल्याची दहीहंडी नाथवंशज ह.भ.प. रावसाहेब महाराज यांच्या हस्ते फोडण्यात आली.
पैठण :
खडकी सोडियेला मोटा।
अजीचा दहीकाला गोमटा ।।
घ्यारे घ्यारे दहीभात।
आम्हा देतो पंढरीनाथ ।।
ऐन सूर्यास्ताच्या समयी टाळ-मृदंगाच्या गजरात भानुदास-एकनाथांच्या जयघोषात नाथ मंदिरातील काल्याची दहीहंडी नाथवंशज ह.भ.प. रावसाहेब महाराज यांच्या हस्ते फोडण्यात आली. काल्याचा प्रसाद व नाथ समाधीचे दर्शन घेऊन वारकरी तृप्त मनाने परतीच्या मार्गावर चालते झाले. दरम्यान, आज नाथषष्ठीस आलेल्या वारकºयांनी विविध फडांवर काल्याचे कीर्तन करीत प्रसादाचे वाटप करून पैठणनगरीचा निरोप घेतला. नाथषष्ठीच्या इतिहासात प्रथमच यंदा काला हंडीसाठी लाखोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावून गर्दीचा विक्रम नोंदवला.
शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मानाची नाथवंशजांची काला दिंडी गावातील नाथ मंदिरातून काढण्यात आली. पालखी ओटामार्गे वाळवंटातून दिंडी नाथ मंदिरात नेण्यात आली. दरम्यान, कृष्ण दयार्णव महाराज यांची दिंडीही मंदिरात दाखल झाली. त्याच वेळी दक्षिण दरवाजातून ह.भ.प. अंमळनेरकर महाराज यांचीही दिंडी नाथ मंदिरात दाखल झाली. मंदिरात नाथवंशज पुष्कर महाराज गोसावी, योगीराज महाराज गोसावी, समस्त नाथवंशजांनी रिंगण करून भानुदास-एकनाथांच्या गजरात वारकरी व भाविकांसह पावल्या खेळल्या. यावेळी हजारो महिला भाविकांनी सजवलेल्या कलशातून दहीहंडीचा प्रसाद करून आणला होता. दहीहंडीचा प्रसाद फुटताच मंदिरात एकमेकांना काल्याचा प्रसाद वाटत होते.
दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी आ. संदीपान भुमरे, खा. चंद्रकांत खैरे, नगराध्यक्ष सूरज लोळगे, दत्ता गोर्डे, माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार संजय वाघचौरे, काँग्रेसचे प्रदेश सचिव रवींद्र काळे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छबिना पालखीवर पुष्पवृष्टी
आलेल्या विविध दिंडी प्रमुखांनी आपापल्या फडावर काल्याचे कीर्तन करून पैठणनगरीचा निरोप घेतला. या वारकºयांना निरोप देताना आज पैठणकरांना भरून येत होते.
गुरुवारी रात्री १२ वाजता गावातील नाथ मंदिरातून नाथ महाराजांच्या पादुकांची छबिना पालखी काढण्यात आली. या पालखीत मोठ्या संख्येने वारकरी सहभागी झाले होते. ठिकठिकाणी या पालखीवर नागरिकांनी पुष्पवृष्टी केली. ही पालखी गोदावरीच्या भेटीस नेण्यात आली व पुन्हा नाथ मंदिरात नेण्यात आली.
शहर झाले सुने-सुने
वारकºयांचे तीन दिवसांपासून पैठणनगरीत असलेले वास्तव्य, संत-महंतांचे कीर्तन, भजन, दिंड्या, फड, राहुट्या, टाळ-मृदंग यासह भानुदास-एकनाथांच्या गजराने पैठणनगरी दुमदुमून गेली होती. अनेक वर्षांपासून सातत्याने येणाºया वारकºयांचे येथील नागरिकांशी आध्यात्मिक नाते गुंफले गेले आहे. यातून मोठा स्नेह निर्माण झालेला आहे. आज या वारकºयांचे पैठणनगरीतून प्रस्थान झाल्याने शहरातील हरिनामाचा गजर थंडावला. यामुळे येणारे दोन-तीन दिवस पैठणकरांना मोठे सुने-सुने वाटणार आहे.