नाथषष्ठी सोहळ्याची सांगता : काल्याचा प्रसाद घेऊन वारकरी परतीच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:12 AM2018-03-10T00:12:58+5:302018-03-10T00:13:10+5:30

नाथ मंदिरातील काल्याची दहीहंडी नाथवंशज ह.भ.प. रावसाहेब महाराज यांच्या हस्ते फोडण्यात आली. काल्याचा प्रसाद व नाथ समाधीचे दर्शन घेऊन वारकरी तृप्त मनाने परतीच्या मार्गावर चालते झाले. दरम्यान, आज नाथषष्ठीस आलेल्या वारक-यांनी विविध फडांवर काल्याचे कीर्तन करीत प्रसादाचे वाटप करून पैठणनगरीचा निरोप घेतला.

The story of the Nath Shashtha: On the way to Warkari returning with Kala Prasad, | नाथषष्ठी सोहळ्याची सांगता : काल्याचा प्रसाद घेऊन वारकरी परतीच्या वाटेवर

नाथषष्ठी सोहळ्याची सांगता : काल्याचा प्रसाद घेऊन वारकरी परतीच्या वाटेवर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण :
खडकी सोडियेला मोटा।
अजीचा दहीकाला गोमटा ।।
घ्यारे घ्यारे दहीभात।
आम्हा देतो पंढरीनाथ ।।
ऐन सूर्यास्ताच्या समयी टाळ-मृदंगाच्या गजरात भानुदास-एकनाथांच्या जयघोषात नाथ मंदिरातील काल्याची दहीहंडी नाथवंशज ह.भ.प. रावसाहेब महाराज यांच्या हस्ते फोडण्यात आली. काल्याचा प्रसाद व नाथ समाधीचे दर्शन घेऊन वारकरी तृप्त मनाने परतीच्या मार्गावर चालते झाले. दरम्यान, आज नाथषष्ठीस आलेल्या वारक-यांनी विविध फडांवर काल्याचे कीर्तन करीत प्रसादाचे वाटप करून पैठणनगरीचा निरोप घेतला. नाथषष्ठीच्या इतिहासात प्रथमच यंदा काला हंडीसाठी लाखोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावून गर्दीचा विक्रम नोंदवला.
शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मानाची नाथवंशजांची काला दिंडी गावातील नाथ मंदिरातून काढण्यात आली. पालखी ओटामार्गे वाळवंटातून दिंडी नाथ मंदिरात नेण्यात आली. दरम्यान, कृष्ण दयार्णव महाराज यांची दिंडीही मंदिरात दाखल झाली. त्याच वेळी दक्षिण दरवाजातून ह.भ.प. अंमळनेरकर महाराज यांचीही दिंडी नाथ मंदिरात दाखल झाली. मंदिरात नाथवंशज पुष्कर महाराज गोसावी, योगीराज महाराज गोसावी, समस्त नाथवंशजांनी रिंगण करून भानुदास-एकनाथांच्या गजरात वारकरी व भाविकांसह पावल्या खेळल्या. यावेळी हजारो महिला भाविकांनी सजवलेल्या कलशातून दहीहंडीचा प्रसाद करून आणला होता. दहीहंडीचा प्रसाद फुटताच मंदिरात एकमेकांना काल्याचा प्रसाद वाटत होते.
छबिना पालखीवर पुष्पवृष्टी
आलेल्या विविध दिंडी प्रमुखांनी आपापल्या फडावर काल्याचे कीर्तन करून पैठणनगरीचा निरोप घेतला. या वारकºयांना निरोप देताना आज पैठणकरांना भरून येत होते.
गुरुवारी रात्री १२ वाजता गावातील नाथ मंदिरातून नाथ महाराजांच्या पादुकांची छबिना पालखी काढण्यात आली. या पालखीत मोठ्या संख्येने वारकरी सहभागी झाले होते. ठिकठिकाणी या पालखीवर नागरिकांनी पुष्पवृष्टी केली. ही पालखी गोदावरीच्या भेटीस नेण्यात आली व पुन्हा नाथ मंदिरात नेण्यात आली.

Web Title: The story of the Nath Shashtha: On the way to Warkari returning with Kala Prasad,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.