विचित्र अपघात;२ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2016 01:04 AM2016-06-02T01:04:44+5:302016-06-02T01:14:05+5:30

औरंगाबाद : रस्त्यावर सांडलेल्या तेलामुळे घसरलेल्या दुचाकीचालकास वाचविताना दोन कार एकमेकांवर आदळल्या.

Strange accident; 2 injured | विचित्र अपघात;२ जखमी

विचित्र अपघात;२ जखमी

googlenewsNext

औरंगाबाद : रस्त्यावर सांडलेल्या तेलामुळे घसरलेल्या दुचाकीचालकास वाचविताना दोन कार एकमेकांवर आदळल्या. यावेळी दोन्ही कारचालकांनी प्रसंगावधान राखून ब्रेक लावल्याने मोठा अपघात होता होता वाचला. या अपघातात दुचाकीवरील दोघे किरकोळ जखमी झाले; मात्र दुचाकी आणि अन्य दोन कारचे मोठे नुकसान झाले. हा अपघात जालना रोडवरील राज आॅटोसमोर बुधवारी सायंकाळी घडला.
रफिक पठाण (रा. एमजीएम परिसर) आणि विलास राठोड, अशी जखमींची नावे आहेत. हे दोघे मोटारसायकलने (क्रमांक एमएच-२० डीएल ५०७४) सेव्हन हिल उड्डाणपुलाकडून सिडको बसस्थानकाकडे जात होते. राज आॅटोसमोर सांडलेल्या तेलावर पठाण यांची दुचाकी घसरली. त्यांच्यामागे असलेल्या स्विफ्ट कारचालकाने (क्र. एमएच-४३ एबी ५८९६) त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला.
मात्र, कारची दुचाकीला जोरदार धडक बसली. त्यामुळे पठाण आणि राठोड हे दोघेही रस्त्यावर पडले. यावेळी स्विफ्ट कारच्या मागे वेगात असलेली ह्युंदाई कार (क्र.एमएच-२० बीवाय ४८८५) स्विफ्टवर आदळली. या अपघातात दुचाकीस्वार रस्त्यावर पडले. तेव्हा अन्य एका कारचालकाने प्रसंगावधान राखून ब्रेक लावल्याने मोठा अपघात होता होता वाचला. पठाण यांना दुखापत झाली.
मदतीसाठी धावले अनेक जण
अपघात घडताच राज आॅटो तसेच वाहनांचे शोरूम असलेल्या अरिहंत शेवरोलेमधील कर्मचारी तातडीने मदतीला धावले. अनेक वाहनचालकांनीही आपली वाहने उभी करून दोन्ही जखमींना रस्त्यावरून उचलून फुटपाथवर आणून बसविले. काही जणांनी पठाण यांची छाती चोळली तर काहींनी त्यांच्या अंगावरील कपडे सैल केले.
राठोड यांना किरकोळ मार लागला. प्रत्यक्षदर्र्शींनी त्यांना मदत केली. रिक्षातून त्यांना एमजीएम रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सिडको पोलिसांनी पंचनामा केला.
मोबाईलमुळे झाला अपघात
दुचाकीचालक मोबाईलवर बोलत असल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत होते. मोबाईलवर बोलत असताना दुचाकीचालकाने अचानक ब्रेक लावल्याने हा अपघात घडला, अशी चर्चा घटनास्थळी होती.
३ महिन्यांपूर्वीही तेथेच अपघात
बुधवारी सायंकाळी अपघात झाला त्याच ठिकाणी तीन महिन्यांपूर्वी रस्ता ओलांडणाऱ्या महिलेचा दुचाकीस्वाराच्या धडकेत मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे त्या दिवशीचा अपघातही सायंकाळीच झाला होता. सेव्हन हिल उड्डाणपुलावरून येणारी वाहने वेगात असतात. त्यामुळे वाहनचालकाचे वेगावर नियंत्रण नसते आणि त्यातून असे अपघात होत आहेत.
खाद्यतेल सांडल्याने घसरली दुचाकी
आजही अनेक दुकानांवर प्लास्टिकच्या कॅरिबॅगमध्ये खाद्यतेल विक्री केले जाते. खाद्यतेलाची कॅरिबॅग कोणाच्या तरी हातातून काही मिनिटांपूर्वीच निसटल्याने रस्त्यावर तेल सांडले होते.
किमान दोन ते तीन लिटर हे तेल असावे. या तेलामुळेच पठाण यांची दुचाकी घसरल्याने हा अपघात झाला. घटनास्थळी तेलाची कॅरिबॅग पडलेली होती.

Web Title: Strange accident; 2 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.