अजिंठा घाटात तीन वाहनांचा विचित्र अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:49 AM2019-02-11T00:49:19+5:302019-02-11T00:49:45+5:30
अजिंठा घाटात मक्याचा ट्रक, कापसाचा टेम्पो व कंटेनर, या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. तिन्ही वाहने एकमेकांवर आदळली व कापसाने भरलेला टेम्पो उलटल्याने अजिंठा घाटात तब्बल तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. हा अपघात रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अजिंठा : अजिंठा घाटात मक्याचा ट्रक, कापसाचा टेम्पो व कंटेनर, या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. तिन्ही वाहने एकमेकांवर आदळली व कापसाने भरलेला टेम्पो उलटल्याने अजिंठा घाटात तब्बल तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. हा अपघात रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास झाला.
या अपघातात टेम्पोचा चालक संतोष बोराडे हा किरकोळ जखमी झाला. मात्र तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. जळकी (ता.सिल्लोड) हून जामनेरकडे ३० टन कापूस घेऊन जाणारा टेम्पो (एमएच-०१ एल २४८) हा मक्याच्या ट्रकला (एमएच-२० डीई ७१४२) ओव्हरटेक करून खाली उतरत असताना समोरून येणाऱ्या कंटेनरला (एमएच-१२ एलटी ९६००) समोरासमोर जाऊन धडकून उलटला.
या तिन्ही जड वाहनांच्या अपघातामुळे घाटात तब्बल तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. पंधरा कि.मी.पर्यंत वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. या अपघाताची माहिती मिळताच अजिंठा पोलीस ठाण्याचे सपोनि. किरण आहेर, कर्मचारी विकास चौधरी, कृष्णा ढाकरे, हेमराज मिरी, बी. ए. साबळे, प्रदीप बेदरकर, दीपक भंगाळे तसेच फर्दापूरचे पोलीस कर्मचारी सुनील भिवसने, रज्जाक खान, शेख अतीक, शेख नासेर, नदीम खान यांनी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. अजिंठा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
४माझ्या मक्याच्या ट्रकला कापसाच्या टेम्पोने पाठीमागून धडक देऊन ओव्हरटेक करताना समोरून येणाºया कंटेनरला धडकला आणि पल्टी झाला. मी पाठीमागे असल्याने ब्रेक दाबून ट्रक कंट्रोल केला. वेळेवर ब्रेक मारला नसता तर कापसाच्या टेम्पोला अजून जोराने धक्का लागून तो दरीत कोसळला असता, असे ट्रकचालक कौतिक सूर्यवंशी यांनी सांगितले.